Home /News /national /

वडिलांनीच केला शेहला राशिदवर Anti National असल्याचा आरोप; कोण आहे काश्मीरचा चेहरा बनू इच्छिणारी युवा कार्यकर्ती?

वडिलांनीच केला शेहला राशिदवर Anti National असल्याचा आरोप; कोण आहे काश्मीरचा चेहरा बनू इच्छिणारी युवा कार्यकर्ती?

शेहलाने (Shahela Rashid) आता काश्मीरमधील युवा नेता अशी ओळख मिळवली असली तरी तिच्याबाबतचे वाद संपलेले नाहीत.

    नवी दिल्ली, 2 डिसेंबर  : विद्यार्थी चळवळीतून नेते बनलेल्या नेत्यांपैकी एक असलेल्या काश्मिरी वंशाच्या शेहला राशिदवर (Shahela Rashid) आता तिच्या सख्ख्या वडिलांनीच आरोप (Anti National) केले आहेत. त्यामुळे काश्मिरी युवा नेता म्हणून प्रकाशझोतात आलेल्या आणि संघ किंवा उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांचं टीकेचं लक्ष्य ठरलेली ही तरुण कार्यकर्ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.  दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थी आंदोलनाचा नेता कन्हैयाकुमार, (Kanhaiya kumar) रोहित वेमुला (Rohit Vemula) आत्महत्या प्रकरण यासह विद्यार्थी आंदोलनं आणि राजकारण यात पुढाकार घेतल्यानं प्रसिद्धीच्या झोतात आलेली शेहला रशीद शोरा (Shehla Rashid Shora) आता पुन्हा एकदा तिच्या वडिलांनी तिच्यावर केलेल्या आरोपांमुळे प्रकाशझोतात आली आहे. शेहलाने आता काश्मीरमधील युवा नेता अशी ओळख मिळवली असली तरी तिच्याबाबतचे वाद संपलेले नाहीत. नुकतेच तिच्या वडिलांनी अब्दुल राशीद ( Abdul Rashid) यांनी तिच्यावर आरोप केले आहेत; मात्र शेहलाने हे आरोप फेटाळले असून, घरगुती हिंसाचार प्रकरणी तिच्या कुटुंबाने केलेली तक्रार आणि कोर्टाने त्यांना काश्मीरमधील घरात येण्यास केलेली मनाई यामुळे आपले वडील आपल्यावर आरोप करत आहेत, असं म्हटलं आहे. या आधीही अब्दुल रशिद यांनी काश्मीरमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून शेहला ही देशद्रोही असल्याचा आरोप करत, आपल्या जीवाला धोका असल्याचे कळवले होते. पूर्वीपासूनच अनेक वाद्विवादांमध्ये अडकलेली शेहला कोण आहे, सध्या कोणत्या नवीन वादात ती अडकली आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला ‘न्यूज 18’ वर वाचता येईल. शेहलावर तिच्या वडीलांनी देशद्रोहाचा आरोप केला असून तिच्या संस्थांना भारत विरोधी घटकांकडून निधी मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशद्रोहाचा आरोप शेहलावर या आधीही लागला आहे, पण कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. 2017 : पैगंबर मोहमद यांच्याबद्दल तिने लिहिलेल्या फेसबुक पोस्टवर अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीने आक्षेप घेतला होता आणि FIR दाखल केला होती. शेहलाने त्या आधीही आपल्या ब्लॉगवर पैगंबर मोहमद यांच्याबद्दल लिखाण केले होते. 2018 : आयर्लंडमधील एक गायिका शुहदा दावीत हिने धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला होता, तिचं शेहलानं स्वागत केलं होतं, ज्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध व्यक्त झाला होता. त्यामुळे शेहलानं आपलं ट्विटर अकाऊंट बंद केलं होतं. अर्थात नंतर ते पुन्हा सुरू केलं. 2019: फेब्रुवारी महिन्यात डेहराडून इथल्या एका होस्टेलमध्ये  15 ते 20 काश्मिरी मुली अडकल्या होत्या. त्यावेळी पोलीस असूनही या मुलींच्या जीवाला धोका असल्याचं शेहलानं ट्वीट केलं होतं. त्या वेळी पोलिसांनी आरोप तर फेटाळले होतेच पण शेहलावर लोकांना भडकावण्याचा आणि शांतता भंग करण्याचे गुन्हे दाखल केले होते. 2019 : मार्च महिन्यात काश्मीरचे प्रशासकीय अधिकारी असलेले शाह फैजल (Shah Faisal) यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला; त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेहला सहभागी झाली होती आणि तिने हिजाब घातला होता, असा आरोप करण्यात आला होता. त्या वेळी शेहलानं ही संस्कृती असल्याचे सांगितले होते. यावरून सोशल मीडियावर स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या शेहलावर खूप टीका झाली होती. 2019 : ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून टाकण्याच्या घडामोडीदरम्यान, शेहलानं, सैन्याचे जवान काश्मिरी लोकांना त्रास देत असल्याचे ट्वीट केले होते.  सैन्यानं आरोप फेटाळले; तर सर्वोच्च न्यायालयातील वकील आलोक श्रीवास्तव यांनी शेहलाविरुद्ध राजद्रोहाचा आरोप करत तक्रार नोंदवली होती. 2019 : ऑक्टोबर महिन्यात शेहलानं कश्मीरी लोकांचे दमन करणाऱ्या कृतीला कायद्याचे रूप देणाऱ्या व्यवस्थेत ती सहभागी होऊ शकत नसल्याचे सांगत निवडणुकीत भाग घेतला नव्हता. शाह फैजल यांना कस्टडीत घेतल्यानंतर शेहलानं पक्ष सोडला त्यावरूनही जोरदार वादविवाद झाला होता. दरम्यान, सध्या शेहलावर होत असलेल्या आरोपांबाबत शाह फैजल यांनी हा शेहलाचा घरगुती प्रश्न असून, आपल्याला विनाकारण त्यात ओढले जात असल्याचे म्हटले आहे, तर शेहलाच्या वडीलांनी आरोप केला आहे की, या पक्षात सहभागी व्हावे, यासाठी शेहलाला अतिरेकी संघटनांनी तीन कोटी रुपये दिले आहेत. शेहलानं हे आरोप फेटाळले आहेत, पण बातम्या आणि वादविवाद सतत सुरूच आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या