जम्मू 26 ऑगस्ट: देशातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. आसाम, गुजरात, छत्तिसगडमध्ये मुसळधार पाऊस असल्याने पुराची भीषण परिस्थिती आहे. जम्मूमध्येही दमदार पाऊस असून अनेक नद्यांना पूर आलाय. जम्मू जवळच्या गादीघर भागात एका नदीवरच्या पुलाचा अर्धा भागच पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचा संपर्क तुटला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि परिसरात तुफान पाऊस होत आहे. त्यामुळे नदी नाले तुडूंब भरले असून अनेक नद्यांना पूरही आला आहे. इथल्या गादीघर भागातल्या नदीवरचा पूल हा दोन भागांना जोडणारा आहे. शेकडो वाहनांची ये जा या पूलावरून होत असते. बुधवारी दुपारी नदीच्या पाण्याला वेग होता. पुलाच्या टोकापर्यंत पाणी आल्याने वाहतूक थांबली होती. दोन्ही बाजूंना वाहनही थांबली होती. अशातच काही मिनिटांमध्ये पुलाचा अर्धा भाग कोसळला पुराच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. वाहतूक थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला.
पूलच कोसळल्याने आता दुसऱ्या भागात जायचं कसं असा प्रश्न इथल्या लोकांना पडला असून तातडीने डागडुज्जी करावी अशी मागणी इथल्या नागरीकांनी केली आहे.
#WATCH Jammu and Kashmir: A portion of a bridge in Jammu's Gadigarh area collapses, following heavy rainfall in the region. pic.twitter.com/MPwTGefF8D
— ANI (@ANI) August 26, 2020
या पूलावर वाहनांची कायम वर्दळ असते. मात्र पुराचं पाणी पुलावर आल्याने लोकांनी जाणं थांबवलं होतं. त्यामुळे मोठा अपघात टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. घटनेची माहिती कळताच प्रशासनाने या भागातली वाहतूक थांबवली असून ती वळविण्यात आल्याची माहिती दिली आहे.