मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच, कर्नाटकात कुमारस्वामींच्या खुर्चीला पुन्हा काँग्रेसचा सुरूंग?

मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच, कर्नाटकात कुमारस्वामींच्या खुर्चीला पुन्हा काँग्रेसचा सुरूंग?

लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये नव्याने राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता आहे.

  • Share this:

बंगळुरू 16 मे : कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या सरकारला काँग्रेस धक्का देण्याच्या पुन्हा तयारीत आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याने जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी 23 मे 2018ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सत्तेवर येवून त्यांना अजुन वर्षही झालेलं नाही. मात्र काँग्रेस आणि जेडीएसमध्ये शितयुद्ध सुरू झालंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री करा अशी मागणी काँग्रेसच्या काही आमदारांनी आणि नेत्यांनी केल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची चिंता वाढली आहे.

कर्नाटक विधानसभेत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र बहुमताचा आकडा गाठता आला नाही. तरीही भाजपच्या बी.एस यदियुरप्पा यांनी सत्ता स्थापन केली होती. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. सत्तेचं ते नाट्य आणि घोडेबाजाराचा प्रयत्न देशभर गाजला होता. नंतर सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले.

त्यांच्या शपथविधी समारंभाला देशातले सर्व विरोधीपक्षनेते एकत्र आले होते. भाजपविरोधातली ती सर्वात मोठी आघाडी होती. मात्र ती एकता नंतर टिकली नाही. काँग्रेसनेही अनिच्छेनेच जेडीएसला पाठिंबा दिला आणि ते सरकारमध्ये सहभागीही झाले. आता अनेक नेत्यांची सत्ताकांक्षा उफाळून येत असल्याने दोन्ही पक्षांमधल्या कुरबूरी वाढल्या आहेत. काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री एम.बी. पाटील आणि कौशल्य विकास मंत्री परमेश्वर नाईक यांनीही राज्याच्या हितासाठी सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं असं मत नुकतच व्यक्त केलं होतं.

त्यामुळे कर्नाटकसरकारला काँग्रेस सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झालीय. या आधीही कुमारस्वामी यांनी अनेकदा आघाडी सरकार चालवणं किती अवघड असतं याबद्दल आपली व्यथा बोलून दाखवत काँग्रेसच्या व्यवहारावर नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेच्या निकाल काय लागतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं मत राजकीय निरिक्षक व्यक्त करत आहेत.

First published: May 16, 2019, 5:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading