नवी दिल्ली, 17 जुलै: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील जेडीएस-काँग्रेस नेतृत्वाखालील सरकार संकटात सापडण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच 18 जुलै रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीवेळी 15 आमदार सहभागी होणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत आम्ही विधानसभाध्यक्षांना निर्देश देऊ शकत नाही असे ही न्यायालयाने म्हटले आहे.
राज्यातील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. या संदर्भात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर निर्णय देताना आज न्यायालयाने हे स्पष्ट केले की, आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. यासाठी त्यांच्यावर वेळेचे बंधन लादता येणार नाही. अध्यक्ष त्याच्या मर्जीनुसार हवा तेवढा वेळ घेऊन निर्णय देऊ शकतात. राजीनामा दिलेल्या 16 आमदारांना बहुमत चाचणीवेळी सभागृहात हजर राहण्याची सक्ती करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Hearing on Karnataka rebel MLAs case in SC: Supreme Court in its order says, "the Karnataka Speaker cannot be forced to take a decision within a time frame." pic.twitter.com/9cOT8eTL6f
— ANI (@ANI) July 17, 2019
काय होणार
उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या आधी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सहभागृहात बंडखोर आमदार नसल्यामुळे कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांच्या लक्ष अध्यक्षांकडे लागले आहे. कोर्टाचा निर्णय येण्याआधी अध्यक्ष के.आर.रमेश कुमार यांनी सांगितले की, मी जो काही निर्णय घेईन तो राज्यघटना, न्यायालय आणि लोकपाल यांच्याविरुद्ध असणार नाही. जर कुमार यांनी आमदारांचे राजीनामा स्विकारले तर बहुमत चाचणी होण्याआधीच राज्य सरकार कोसळेल.
कर्नाटकातील राजकीय नाट्य सुरु झाल्यापासून बंडखोर आमदार मुंबईत आहेत. उद्या बहुमत चाचणीवेळी देखील हे आमदार मुंबईतच असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड