बंगळुरू 21 जानेवारी : कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने (KDCD) नुकतंच एक परिपत्रक जारी करून १८ वर्षांखालील मुलींना गर्भनिरोधक आणि कंडोमच्या विक्रीवर घालण्यात आलेली वादग्रस्त बंदी मागे घेतली आहे. बंदीमुळे नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित रोग (STDs) याच्या जोखमीबद्दल नवीन वादविवाद सुरू झाले होते. KDCD ने आता फार्मासिस्टना कंडोम आणि गर्भनिरोधक औषधे अल्पवयीन मुलांना विकण्यासाठी बंदी घालण्याबाबतचं कोणतंही परिपत्रक जारी करण्यास नकार दिला आहे.
राज्याचे प्रभारी औषध नियंत्रक भागोजी टी खानपुरे यांच्या हवाल्याने अनेक माध्यमांनी सांगितलं की, राज्य सरकार लैंगिक संक्रमित रोग टाळण्यासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कंडोमचा प्रचार करत आहे. परंतु, ते किशोरवयीन मुलांसाठी किंवा शाळकरी मुलांसाठी नाही. बेंगलोर मिररच्या वृत्तानुसार, खानापुरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 'अल्पवयीन किशोरवयीन मुलांना गर्भनिरोधक विकू नयेत, असे परिपत्रक कठोरपणे जारी करण्यात आले होते'. नंतर खानपुरे स्वतःच म्हणाले, की 'आम्ही अशा आशयाचं कोणतंही परिपत्रक काढलं नाही. मीडियामध्ये हे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं'.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये कंडोम, गर्भनिरोधक, सिगारेट आणि व्हाईटनर सापडल्यानंतर हे परिपत्रक जारी करण्यात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात मोबाइल फोन घेऊन जाण्यापासून रोखण्यासाठी अचानक तपासणी केली गेली होती. मात्र यानंतर शाळेतील अधिकाऱ्यांना धक्का बसला. बॅगमध्ये सेल फोन व्यतिरिक्त, अधिकार्यांना कंडोम, गर्भनिरोधक, लायटर, सिगारेट आणि व्हाईटनर असं साहित्या इयत्ता 8, 9 आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगमधून सापडलं.
वादग्रस्त आदेश जारी झाल्यानंतर लगेचच, तज्ञ आणि फार्मासिस्ट यांनी त्यावर टीका केली आणि म्हटलं की यामुळे नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित संसर्ग (STIs) यामध्ये वाढ होईल. काहींनी असंही म्हटलं की बंदी प्रभावीपणे लागू केली जाऊ शकत नाही, कारण कंडोम आणि गर्भनिरोधक केवळ फार्मसीच नव्हे तर सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. साध्या कपड्यात येणाऱ्या ग्राहकांमध्ये फरक करणं त्यांच्यासाठी अवघड असल्याचंही काही फार्मासिस्टनी म्हटलं. जेव्हा बंदी जारी केली गेली तेव्हा खानपुरे यांनी स्पष्ट केलं होतं, की ते केवळ कंडोम आणि गर्भनिरोधकांपर्यंत मर्यादित नाही तर सिगारेटसाठीही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka