काँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग

काँग्रेसचे सर्व आमदार पुन्हा रिसॉर्टमध्ये, कर्नाटकात  राजकीय हालचालींना वेग

सत्ता स्थापना झाल्यापासूनच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये तणाव आहे. आघाडी सरकार चालवणं हे अत्यंत कठीण काम असल्याचं मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अनेकदा म्हटलं आहे.

  • Share this:

बंगळूरू 18 जानेवारी : कर्नाटकमध्ये पुन्हा राजकीय हालचालींना वेग आलाय. काँग्रेसने शुक्रवारी आपल्य सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यासाठी काँग्रेसने 'व्हिप'ही बजावला होता. मात्र पक्षाचा आदेश धुडकावत चार आमदार गैरहजर राहिल्याने खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळूरूजवळच्या एका रिसॉर्टमध्ये हलवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजप 'ऑपरेशन लोटस' राबवत असल्याचं स्पष्ट झालं होतं. काँग्रेसचे आमदार गळाला लावण्याचे भाजपचे प्रयत्न होते. महाराष्ट्रातूनही सूत्र हालवली जात होती. काही आमदार मुंबईतही आले होते. मात्र पुरेसं संख्याबळ न जमल्याने भाजपचा प्रयोग यशस्वी झाला नाही.

काँग्रेस आणि जेडीएस यांच्यामध्येही आलबेल नसल्याने भाजप त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. तर जेडीएस आणि काँग्रेसने भाजपवर घोडेबाजार करण्याचा आरोप केलाय. तर आधी आपलं घर सांभाळा भाजपवर आरोप करू नका असा पलटवार भाजपने केला होता.

कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा भाजपला मिळाल्या होत्या. नंतर त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. तर कमी जागा मिळूनही जेडीएसला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि राज्यात आघाडी सरकारची स्थापना झाली.

मात्र सत्ता स्थापना झाल्यापासूनच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये तणाव आहे. आघाडी सरकार चालवणं हे अत्यंत कठीण काम असल्याचं मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अनेकदा म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे कर्नाटकात गल्या काही महिन्यात कायम अस्थिरताच राहिली आहे.

दरम्यान, कर्नाटक विधासभेच्या 224 जागांपैकी 222 जागांवर काही महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. त्यात भाजपला 104, काँग्रेसला 78 तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत सत्ता मिळवली. जेडीएसचे एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. नंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसला आणखी दोन जागा मिळाल्या होत्या.

First published: January 18, 2019, 7:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading