बंगळुरू, 13 जुलै : कर्नाटकात सत्तास्थापनेपासून सुरू झालेला गोंधळ अजुनही सुरूच आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वास ठराव मांडण्याबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांनी शनिवारी सांगितलं की, विरोधी पक्ष अविश्वास ठराव मांडण्यासाठी तयार आहे. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींनी विश्वास ठरावाबाबत वक्तव्य केलं होतं. विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी कुमारस्वामींनी विधानसभा अध्यक्षांना यासाठी वेळ निश्चित करण्याची विनंती केली होती.
कुमारस्वामींच्या विश्वास ठराव घेण्याबाबतच्या घोषणेनं विरोधकांना धक्का बसला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुमारस्वामींच्या या घोषणेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. सभागृहात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा मांडल्यानं विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री कुमारस्वामींनी केलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या या घोषणेनंतर भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, अविश्वास प्रस्तावा मांडण्यात आम्हाला कसलीही अडचण नाही. आम्ही सोमवार पर्यंत वाट पाहू. त्यानंतर अविश्वास ठरावाला सामोर जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.
कर्नाटक विधानसभेतील परिस्थिती आहे तशी ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय यावर 16 जुलैला निर्णय घेणार आहे. अविश्वास ठरावावर कुमारस्वामींच्या घोषणेनं भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. अशा स्थितीत विपरीत काही घ़डू नये म्हणून भाजपने त्यांचे आमदार रिसॉर्टमध्ये पाठवले आहेत.
कर्नाटकातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की, जर यावेळी विश्वासमत घेण्यात आलं तर त्यावर चर्चा आणि मतदान घेण्यात इतका वेळ जाईल की इतर सर्व गोष्टी बाजूला पडतील. काँग्रेस आणि जेडीएस त्यांच्या आमदारांना व्हीप जारी करणार असल्याचं समजतं. यामध्ये त्या आमदारांचासुद्धा समावेश असेल ज्यांनी राजीनामा दिला आहे. पण आतापर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही.
कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. जर त्यांनी राजीनामा स्वीकारला तर काँग्रेस-जेडीएस यांचं संख्याबळ 118 वरून 100 वर येईल आणि बहुमतासाठीचा आकडा 113 वरून 105 होईल. सध्या भाजपकडे 105 संख्याबळ आहे आणि दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे भाजप 107 वर पोहचेल आणि याच्या जोरावर ते बहुमत पार करू शकतात.
ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?