आता कराची बेकरीलाही विरोध; दडपशाहीविरोधात नेटकऱ्यांनी नोंदवला निषेध

आता कराची बेकरीलाही विरोध; दडपशाहीविरोधात नेटकऱ्यांनी नोंदवला निषेध

पाकिस्तानविरोध इतका वाढतोय की, कराची बेकरीच्या नावातलं 'कराची'ही लोकांना नको झालंय. बंगळुरूमध्ये नुकताच याचा अनुभव आला. लोकांचा रोष लक्षात घेऊन बेकरीच्या नावातल्या कराची या शब्दावर तात्पुरता पडदा लावण्यात आला आहे. पण कराची बेकरी कुणी सुरू केली माहिती आहे का?

  • Share this:

बेंगळुरू, 23 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधी भावना निर्माण होणं सहाजिक आहे. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत अनेक नागरिक गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पाकिस्तानी कलाकार, खेळाडू यांनाही देशात बंदी असावी, अशी मागणी केली जात आहे. त्यालाही जनभावनेची साथ पाहता अनेक कलाकारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. आता पाकिस्तान विरोध याच्या पलीकडे गेलाय आणि बेकरीच्या नावातलं 'कराची' लोकांना नको झालंय. बंगळुरूमध्ये नुकताच याचा अनुभव आला.

कराची बेकरी बंद करा, असं म्हणत काही अज्ञात गुंडांनी बंगळुरूच्या या प्रसिद्ध बेकरीवर हल्ला करायची तयारी केली. लोकांचा रोष लक्षात घेऊन बेकरीच्या नावातल्या कराची या शब्दावर तात्पुरता पडदा लावण्यात आला आहे. आता कराची बेकरीचा हा पडदा टाकलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कराची बेकरीला विरोध करणाऱ्यांना ही बेकरी सुरू करणारे मूळचे हिंदूच असून फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात येऊन ते स्थायिक झाले आणि हैदराबादमध्ये कराची बेकरी सुरू केली.

खानचंद रामनानी हे फाळणीपूर्वीच्या सिंध प्रांतात कराचीमध्ये राहणारे होते. फाळणीनंतर त्यांनी भारतात येऊन हैदराबादमध्ये व्यवसाय सुरू केला. कराची बेकरी हा आता मोठा ब्रँड झाला आहे. पण कराची बेकरीला विरोध करणाऱ्यांना या बेकरीच्या स्थापनेमागची ही पार्श्वभूमी माहीत नसावी, असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरून या गुंडाशाहीचा निषेध केला आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक ओनीर यांच्यासह अनेकांनी ट्विटरवरून या दडपशाहीचा निषेध केला आहे.
कराचीवाला अशा आडनावाची माणसंसुद्धा आपल्या देशात राहतात. ती काही पाकिस्तानी नाहीत. आता त्यांनी आपलं आडनावही बदलायचं का? अशा अर्थाची ट्वीटही काही नेटकऱ्यांनी केली आहेत.

दरम्यान, बंगळुरूमध्ये कराची बेकरीवर दबाव आणणारा जमाव नेमका कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

VIDEO : Pulwama : 'खून का बदला लिया', नागपुरात मोदी-गडकरींचे पोस्टर्सबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 04:26 PM IST

ताज्या बातम्या