07 मे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवालांनी 2 कोटी रुपयांची रोकड घेतल्याचं मी स्वत: पाहिलंय. तसंच, केजरीवाल यांच्या एका नातेवाईकांसाठी 50 कोटी रुपयांचं 'डील' केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. मिश्रा यांच्या या गंभीर आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दिल्लीच्या मंत्रिमंडळातून आम आदमी पार्टीचे नेते कपिल मिश्रा यांची काल (शनिवारी) हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कपिल मिश्रा यांनी आज (रविवारी) सकाळी नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत.
'परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही' असे सांगत, मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसंच मंत्रिपदावरून हटवल्याबद्दल आकसाने बोलत नाहीए. उलट, मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्यानं मला हटवण्यात आल्याचं ही त्यांनी नमूद केलं.
केजरीवाल यांच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. पण सगळे घोटाळ्यांची त्यांना कल्पना होती, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे. याशिवाय केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं 'डील' केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, कपिल मिश्रांनी केलेले सर्व आरोप निराधार आणि बिनबुडाचे असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ते फेटाळून लावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, अरविंद केजरीवाल