Home /News /national /

जोडप्याची Love Story ऐकून पोलिसांनी थेट बोलावला पुजारी, चौकीतच घेतली सप्तपदी

जोडप्याची Love Story ऐकून पोलिसांनी थेट बोलावला पुजारी, चौकीतच घेतली सप्तपदी

ही खरोखरच एका लग्नाची वेगळी गोष्ट आहे. पोलिसांनाच इथे वऱ्हाडी व्हावं लागलं, कारणच तसं घडलं. प्रेमविवाहाची ही अनोखी गोष्ट वाचाच नेमकं काय घडलं...

    कानपूर, 27 जानेवारी : पोलीस स्थानकात नेहमीच आरोपी आणि तक्रारदारांची गर्दी असते. परंतु, कानपूरमधल्या जुही पोलीस स्थानकात लग्नाची लगबग पाहायला मिळाली. जुही पोलीस स्थानकात पोलिसांनी चक्क एका जोडप्याचं लग्न लावून दिलं. तेही त्यांच्या कुटुंबीयांची समजूत काढून... त्यामुळे सध्या कानपूरच्या जुही पोलिसांची चर्चा सर्वत्र रंगत आहे. राहुल दोन वर्षांपूर्वी त्याच्या शेजारीच राहणाऱ्या नैनाच्या प्रेमात पडला. परंतु, कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे त्यांना विवाह करता येत नव्हता. अखेर त्यांनी कुटुंबीयांचा विरोधाला न जुमानता गेल्या वर्षी जुलै महिन्यात लपून कोर्टात लग्न केलं. आणि पुन्हा आपल्या परिवारासोबत राहू लागले. नैनाच्या घरात तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली. एका तरुणासोबत नैनाचे कुटुंबीय लग्न करण्याच्या विचारात असताना राहुल आणि नैना यांनी दोन महिन्यापूर्वी घरातून पळ काढला. याप्रकरणी नैनाच्या वडिलांनी जुही पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर पोलिसांना राहुल आणि नैनाला शोधण्यात यश आलं. राहुल-नैना यांनी आपली बाजू पोलिसांसमोर मांडली. दोघांची प्रेमकहाणी ऐकल्यावर पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना राहुल-नैनाच्या लग्नाचा स्वीकार करण्यास सांगितला. परंतु, दोन्ही कुटुंबीय आपल्या मतावर ठाम होते. अखेर पोलिसांनीच राहुल-नैनाचं लग्न लावून देण्याचं ठरवलं. अन् जुही पोलीस स्थानकातच लग्नाची तयारी सुरू झाली. कानपूरच्या जुही पोलीस स्थानकात पोलिसांनी लग्नाची तयारी सुरू केली. लग्न लावण्यासाठी पुजारीही पोलीस स्थानकात दाखल झाला. शेजारीही लग्नसमारंभासाठी हजर झाले. पोलीस स्थानकात असलेल्या मंदिरासमोर राहुल-नैना हे विवाहबंधनात अडकले. पोलिसांनी नव जोडप्याला आशीर्वाद दिला. अखेर कुटुंबाीयांनीही लग्न मान्य केलं. नवदाम्पत्य आपल्या घरी निघाले. पोलिसांमुळे राहुल-नैनाचा प्रेमविवाह कुटुंबीयांनीही मान्य केला. यामुळं आता त्यांना भविष्यात कोणतीच अडचण येणार नसल्याचं आश्वासनही पोलिसांनी दिलं. एरव्ही कठोर वागणारे खाकी वर्दीवाले प्रेमासमोर काहीसे भावूक झाले. खाकीमधला माणूस यावेळी सर्वांना पाहायला मिळाला. सध्या कानपूरच्या जुही पोलीस स्थानकात पोलिसांनीच लावून दिलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनतोय. यावेळी नागरिक पोलिसांचं भरभरून कौतुक करत आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Love story

    पुढील बातम्या