बेगुसराय, 10 एप्रिल : कन्हैयाकुमार बिहारमधल्या बेगुसरायमधून गिरीराज सिंह यांच्याविरुद्ध निवडणूक लढवतो आहे. त्याने आपला अर्ज भरताना स्वत:ला बेरोजगार घोषित केलं आहे. कन्हैयाकुमार बेरोजगार असला तरी त्याने दोन वर्षांत 8 लाख 60 हजार रुपये जमवल्याचं समोर आलं आहे.
कन्हैयाकुमार हा सीपीआयकडून बेगुसरायमधून निवडणूक लढतो आहे. त्याने 9 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला आपलं उत्पन्न जाहीर करावं लागतं. पुस्तकं लिहिणं, भाषणं देणं या माध्यमातून मला पैसे मिळतात, असं त्याने आपल्या अर्जात लिहिलं आहे.
बिहार से तिहार
2018 मध्ये कन्हैयाकुमारचं पुस्तक 'बिहार से तिहार' हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्याचं हे पुस्तक खूपच गाजलं.
कोणतीही नोकरी किंवा उद्योग नसल्यामुळे आपण बेरोजगारच आहोत, असं त्याचं म्हणणं आहे.
कन्हैयाने नुकतंच निवडणूक निधी जमवण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याबद्दल त्याने त्याच्या फेसबुक वॉलवर सगळ्यांचे आभार मानले आहेत.
गिरीराज सिंह यांना आव्हान
कन्हैयाकुमारच्या उमेदवारीमुळे बिहारमधला बेगुसराय मतदारसंघ देशभरात गाजतो आहे. त्याच्याविरुद्ध निवडणूक लढण्यासाठी भाजपचे नेते गिरीराज सिंह आधी तयार नव्हते. नंतर पक्षाने मनधरणी केल्यावर ते इथून रिंगणात उतरले. त्यामुळे तर कन्हैयाकुमारचं पारडं इथे चांगलंच जड असल्याची चर्चा सुरू झाली.
कन्हैयाकुमारने म्हटलं आहे की, आईचा आशिर्वाद घेऊनच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. आपलं उद्धिष्ठ कितीही मोठं असलं तरी सातत्याने प्रयत्न केले तर यश मिळतंच, ही शिकवण मला माझ्या आईकडून मिळाली आहे. कन्हैयाकुमारने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला. हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे.
==============================================================================================================================================================
VIDEO : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चौकीदार चोरच हे सिद्ध - राहुल गांधी