'भाजप नेत्याचा खून झाल्यास मी त्याच्या कुटुंबाला 30 लाख देईन', कमलेश तिवारींच्या पत्नीचा संताप

'भाजप नेत्याचा खून झाल्यास मी त्याच्या कुटुंबाला 30 लाख देईन', कमलेश तिवारींच्या पत्नीचा संताप

कमलेश तिवारींच्या हत्येचा तपास नीट होत नसून सरकारने दिलेल्या मदतीवर त्यांची पत्नी किरण यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:

लखनऊ, 28 ऑक्टोबर : हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी किरण तिवारी यांनी तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सरकारला देखील घरचा आहेर देत 15 लाख रुपयांच्या मदतीवरून जोरदार टीका केली. किरण तिवारी यांनी म्हटलं की, भाजप नेत्याची हत्या झाली तर मी 30 लाख रुपये पीडीत कुटुंबाला देईन.

कमलेश तिवारी यांच्या पत्नीला सरकारकडून 15 लाख रुपयांची मदत देण्यात आली. त्याबद्दल बोलताना किरण तिवारी म्हणाल्या की, मी सरकारने दिलेले 15 लाख तोपर्यंत जवळ ठेवेन जोपर्यंत एखाद्या भाजप नेत्याची हत्या होत नाही. त्यानंतर या 15 लाखात तेवढेच पैसे घालून ते शोकाकूल परिवाराला देईन असं किरण तिवारी यांनी सांगितलं.

हत्येच्या तपासावर मी समाधानी नाही. हे प्रकरण एनआय़एकडे का सोपवलं जात नाही? उत्तर प्रदेश पोलिस आणि एटीएस याचा तपास नीट करू शकणार नाहीत. हत्येच्या एक दिवस आधी कमलेश तिवारी यांनी जीवाला धोका असल्याचं हिंदू समाज पार्टीला सांगितल होतं. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही असं किरण तिवारी यांनी म्हटलं.

दादरी लिंचिग प्रकरणात पीडितांना 50 लाख रुपये देण्यात आले. मात्र आम्हाला 15 लाख रुपये. प्रत्येक जीवाची किंमत वेगवेगळी असते का असा सवाल कमलेश तिवारी यांची पत्नी किरण यांनी विचारला आहे. खरे मारेकरी जोपर्यंत फासावर लटकवले जाणार नाहीत तोपर्यंत शांत राहणार नाही असंही किरण यांनी म्हटलं आहे.

कमलेश तिवारी यांची त्यांच्या कार्यालयात 18 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुजरात एटीएसने 22 ऑक्टोबरला दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी आणखी पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कमलेश तिवारी यांच्या हत्येचा कट आणि मारेकऱ्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

वाचा : कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास, ते वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lucknow
First Published: Oct 28, 2019 01:11 PM IST

ताज्या बातम्या