“अर्धा देश उपाशी असताना नव्या संसदेसाठी 1000 कोटी खर्च का?’’ कमल हसन यांचा मोदींना सवाल

“अर्धा देश उपाशी असताना नव्या संसदेसाठी 1000 कोटी खर्च का?’’ कमल हसन यांचा मोदींना सवाल

नव्या संसद भवानाच्या इमारतीसाठी तब्बल 1000 कोटी खर्च येणार आहे. या खर्चावरुन प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हसन (Kamal Haasan) यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले आहेत.

  • Share this:

चेन्नई, 13 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वीच नव्या संसद भवनाच्या (New Parliament Building) इमारतीचे भूमीपूजन केले होते. या संसद भवनाच्या इमारतीसाठी तब्बल 1000 कोटी खर्च येणार आहे. या खर्चावरुन प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हसन (Kamal Haasan) यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले आहेत.

काय म्हणाले कमल हसन?

“देशातील कोरोना (COVID19) काळात अर्धी जनता उपाशी आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या परिस्थितीत जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करुन नवे संसद भवन का बांधले जात आहे?’’, असा प्रश्न त्यांनी पंतप्रधानांना विचारला आहे. भारताच्या शेजारील देश चीनचं उदाहरण देखील कमल हसन यांनी यावेळी दिलं. “ग्रेट वॉल ऑफ चायना’ बांधली जात असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील राज्यकर्त्यांनी ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे, असे सांगितले होते. तुम्ही कुणाचं संरक्षण करण्यासाठी नवं संसद भवन बांधत आहात?  माननीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं’’.

तामिळनाडू विधानसभेची तयारी सुरू

कमल हसन यांच्या तामिळनाडू राज्यातील विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराला कमल हसन यांनी मदुराईमधून सुरुवात केली आहे. या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं ते आगामी काही दिवसांमध्ये तामिळनाडूतील प्रमुख जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

नवे संसद भवन कधी पूर्ण होणार?

देशाचे नवे संसद भवन ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रस्तावित नवीन संसदेच्या इमारतीत प्रत्येक संसद सदस्याला 40 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नवीन संसद भवनात लोकसभा कक्षात 888 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था केली जाईल. तर राज्यसभा कक्षात 384 सदस्य बसू शकतील. भविष्यात संसद सदस्यांची संख्या वाढू शकते, हे लक्षात घेऊन बैठक व्यवस्था जास्तीची बनवली जात आहे. सध्याच्या संसदेच्या इमारतीजवळच याचे बांधकाम केले जाणार आहे.

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 6:54 PM IST

ताज्या बातम्या