नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं फ्रिलांन्सिंग करणाऱ्या एका पत्रकाराला बेड्या ठोकल्याची माहिती मिळाली आहे. या पत्रकाराकडून देशाच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. राजीव शर्मा असं या पत्रकाराचं नाव असून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं त्यांना अटक केली आहे.
राजीव शर्माकडे ही कागदपत्र कशी पोहोचली आणि त्याचं काय वापर करणार होता या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणी राजीव शर्माला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
हे वाचा-अमोल कोल्हेंनी कोव्हिड टेस्टसाठी भेट दिलं उपकरण, काही सेकंदात करणार 24 चाचण्या
शर्मा एक युट्यूब चॅनलही चालवतात या शिवाय त्यांनी वेगवेगळ्या पत्रकारीतेच्या संस्थांसोबत कामही केलं आहे. त्याने ग्लोबल टाइम्ससाठी एक लेखही लिहिला होता.
राजीव शर्मानं लिहिलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये नेमकं काय म्हटलं होतं?
7 सप्टेंबर रोजी ग्लोबल टाइम्ससाठी त्याने एक लेख लिहिला होता. या लेखात 5 मेच्या रात्री भारत आणि चीनमध्ये झालेल्या तणावानंतर गेल्या अनेक वर्षांतील दोन्ही देशांच्या व्यवहारीक संबंधांवर मोठा परिणाम झाला. दोन्ही देशांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार आणि आयात-निर्यातीवरही मोठ्या प्रमाणात बंदी आली. 1962च्या युद्धानंतर दोन्ही देशांमधील असलेला हा तणाव सर्वात मोठी धोक्याची घंटा असल्याचंही त्याने म्हटलं. आपल्या लोकांसाठी शांततापूर्ण उज्ज्वल भविष्य निर्माण करणं हा त्यांचा उद्देश आहे. एकमेकांविरोधात सैन्य उभं करणं हा उद्देश नाही.
विशेष पथकाचे पोलीस उपायुक्त संजीव कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या संरक्षणाबाबत गोपनीय माहिती असणारी कागदपत्र राजीव शर्माकडे सापडली आहेत. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल. 14 सप्टेंबर रोजी राजीव शर्माला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयानं 6 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने चौकशीदरम्यान ही कागदपत्र कुठून मिळवली यासंदर्भात पोलिसांना काही दुवे मिळाले असून आता त्या ठिकाणी जाऊन तपास करणार आहेत. या प्रकरणात राजीव शर्माच्या कुटुंबीयांची चौकशी देखील पोलीस करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China