मराठी बातम्या /बातम्या /देश /निकृष्ट ड्रेनेज, अंधाधुंद बांधकाम की NTPC बोगदा? जोशीमठला विनाशाच्या उंबरठ्यावर नेण्यास जबाबदार कोण?

निकृष्ट ड्रेनेज, अंधाधुंद बांधकाम की NTPC बोगदा? जोशीमठला विनाशाच्या उंबरठ्यावर नेण्यास जबाबदार कोण?

जोशीमठला विनाशाच्या उंबरठ्यावर नेण्यास जबाबदार कोण?

जोशीमठला विनाशाच्या उंबरठ्यावर नेण्यास जबाबदार कोण?

Joshimath Landslide Crisis: जोशीमठचा विध्वंस ही केवळ काही दिवसांची कथा नाही. उलट यामागे अनेक दशकांच्या दुर्लक्षाची मोठी भूमिका आहे. यापूर्वी कोणीही याबाबत इशारा दिला नाही, असे नाही. असे असूनही, परिसरात सातत्याने होत असलेल्या अंधाधुंद मानवी कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न क्वचितच झाला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

जोशीमठ, 9 जानेवारी : उत्तराखंड राज्यातील जोशीमठ वर मोठं संकट कोसळलं आहे. घरं आणि इमारतींना भेगा पडल्या असून जमीन खचत चालली आहे. लोक जीव मुठीत घेऊन एक एक दिवस ढकलत आहेत. तज्ज्ञांनी अनेक इशारे देऊनही आपत्तीग्रस्त जोशीमठ परिसरातील शेकडो इमारतींमधून वर्षानुवर्षे वाहणाऱ्या सांडपाण्याची योग्य व्यवस्था झाली नाही. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या शहराची खराब ड्रेनेज व्यवस्था आता संकटाचे कारण झालं आहे. शहराच्या आजूबाजूला निष्काळजी बांधकामांनी आपत्ती ओढवून घेतल्याचे दिसत आहे. या संकटामागे आणखी काही कारण आहे का? याचाही अभ्यास केला जात आहे. एनटीपीसीचा 520 मेगावॅट वीज प्रकल्पासाठी जोशीमठजवळील तपोवन ते विष्णुगढपर्यंतचा 12 किमी लांबीचा बोगदाही यामुळे रडारवर आला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी ताबडतोब जोशमठसाठी ड्रेनेज प्लॅन तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यावर ते कोणत्याही औपचारिकतेशिवाय स्वाक्षरी करतील. दुसरीकडे, एनटीपीसी या संकटाला भूमिगत बोगदा जबाबदार असल्याचं फेटाळत आहेत. त्यांच्या बोगद्यात पाण्याची गळती नसून ते कोरडे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच जोशीमठ शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. हा बोगदा कमकुवत असल्याचे इतिहास सांगतो. तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये चमोली येथे आलेल्या पुराच्या वेळी या बोगद्यात 54 मजुरांचा मृत्यू झाला होता. सात संस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश असलेले केंद्रीय पथक आता पाण्याच्या गळतीचे प्राथमिक स्त्रोत शोधण्यासाठी काम करत आहे.

ड्रेनेज सिस्टम नसलेले शहर

जोशीमठ शहरात सुमारे 600 घरे कोसळणार आहेत. हे पाहता राज्य सरकार खडबडून जागे झाले असून मलनिस्सारण ​​आराखड्यासाठी सज्ज झाले आहे. असे मानले जाते की डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोशीमठच्या घरांचे पाणी नैसर्गिकरित्या खेडे आणि शहरांमधून वाहत असलेल्या नऊ नाल्यांमध्ये वाहून जाते आणि धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांना मिळते. पर्यटनाची भरभराट होऊन बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली. घरे आणि इतर बांधकामांमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला. 2 जानेवारीच्या रात्री, जोशीमठच्या एका टाउनशिपमध्ये जमिनीतून पाणी बाहेर आले, ज्यामुळे धोक्याची घंटा वाजली.

वाचा - Joshimath शहर धसतंय, चारधाम यात्रेवरही संकट, बद्रीनाथाचे दर्शन होणार का?

वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीच्या डॉ. स्वप्नमिता चौधरी यांनी त्यांच्या 2006 च्या अहवालात खराब ड्रेनेज सिस्टम आणि सांडपाणी प्रणालींशी संबंधित धोके समोर आणले. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (बीआरओ) ड्रेनेज व्यवस्थेवरही जोरदार टीका केली. विशेषत: पावसाळ्यात जेव्हा नऊ नाल्यांमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. तज्ज्ञांनी इशारा दिला की या परिसरात पर्यटकांची विश्रामगृहे आणि घरे वेगाने बांधली जात आहेत. शहरात छोटे-छोटे नाले आहेत. मात्र, या नाल्यांचे पाणी कुठे जाते हे पाहण्यासाठी यंत्रणा नाही. भूगर्भशास्त्रज्ञांनी असेही निरीक्षण केले होते की, नदीच्या प्रवाहामुळे भरपूर माती वाहून जात असल्याने जोशीमठची माती मोकळी होत आहे. नवीन उपग्रह डेटा सूचित करतो की काही प्रवाहांनी त्यांचे चॅनेल रुंद केले आहेत किंवा मार्ग बदलला आहे.

बोगदे आणि रस्ते

अनेक रस्त्यांच्या बांधकामामुळे नैसर्गिक रचनेलाही खीळ बसली आहे. महामार्ग आणि रस्त्यांच्या बांधकामासाठी अत्याधिक ब्लास्टिंगमुळे उतार कमकुवत आणि अस्थिर झाला आहे. डायनामाइटचे स्फोट आणि जड वाहतुकीमुळे होणारी कंपनेही नुकसान करतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्थानिक लोक एनटीपीसी बोगद्यालाही दोष देत आहेत. त्याविरोधात जोशीमठमध्ये अनेक आंदोलने झाली आहेत. जोशीमठ शहराजवळील तपोवन बाजूला आठ किलोमीटर लांबीचा बोगदा बोरिंग मशिनने खोदण्यात आला आहे. दशकाहून अधिक काळ वीज प्रकल्पाचे काम सुरू आहे. जोशीमठमधील संकटाला बोगदा जबाबदार असल्याचे एनटीपीसी पूर्णपणे नाकारत आहे. परंतु, स्थानिक लोक हे मान्य करत नाहीत. आता केंद्रीय पथक खरी कारणे शोधून काढेल. जोशीमठमध्ये सध्या सुरू असलेल्या इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबाबतही केंद्राला निर्णय घ्यावा लागेल, कारण ते सैन्याच्या हालचालीसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे.

First published:

Tags: Uttarakhand