आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलीय. इतर दोन दोषींना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावली गेलीय.

  • Share this:

जोधपूर, 25 एप्रिल : लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवलं. त्याला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर इतर दोघा आरोपींना 20 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जोधपूर विशेष कोर्टात न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांनी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जोधपूर विशेष न्यायालयाने सुनावलेला निकाल ऐकताच आसारामला रडू कोसळले, हरी ओम हरी ओमचा जप तो करत होता.

सुनावणीवेळी हिंसाचार भडकू नये यासाठी जोधपूरपासून दिल्लीपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर कालपासून जोधपूरमध्ये 155 लागू करण्यात आला होता. जोधपूर कोर्टाने आसारामला पॉक्सोसह अन्य 3 कलमांतर्गत दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे आसाराम बापूचं जेलमधून सुटण्याचं स्वप्न भंगलं आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला होता. मुलीच्या तक्रारीनंतर आसारामला इंदूरहून अटक करण्यात आली होती.

काय आहे आसाराम बापू प्रकरण ?

आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती. या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013ला तिच्या बलात्कार करण्यात आला.

आसाराम बापू यांच्या खटल्याचा घटनाक्रम

- 20 ऑगस्ट 2013ला आसारामानी 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला.

- 23 ऑगस्ट 2013ला आसारामाविरोधात गुन्हा दाखल झाला. पण यावर भडकलेल्या आसाराम समर्थकांची कमला मार्केट पोलीस स्टेशनमधे तोडफोड केली.

- 28 ऑगस्ट 2013ला पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामला फाशी देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुलगी मनोरूग्ण असल्याचा दावा आसारामने केला.

- 29 ऑगस्ट 2013ला काँग्रेस नेते मुद्दाम त्यांना लक्ष्य करून असले आरोप करत आहेत असा अप्रत्यक्ष आरोप आसारामने केला.

- 31 ऑगस्ट 2013ला आसारामला जोधपूर पोलिसांनी अटक केली, आसारामची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. पण या दरम्यान समर्थकांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातला होता.

- नोव्हेंबर 2013ला जोधपूर पोलिसांनी आसाराम विरोधात आरोपपत्र दाखल केलं. आसाराम आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले.

- फेब्रुवारी 2014ला आसारामविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात

झाली.

- ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी आसाराम बापू यांचं वकीलपत्र घेतलं होतं.

- आसाराम बापूंना वेगळाच आजार आहे ज्यामुळे ते महिला त्याच्याकडे आकर्षित होतात असा अजब युक्तिवाद कोर्टात करण्यात आला.

- फेब्रुवारी 2015ला आसाराम बापू केसमधील एक साक्षीदार राहूल सचान जेव्हा आपलं स्टेटमेंट द्यायला कोर्टात चालला होता तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

- 8 जुलै 2015ला दुसऱ्या एक साक्षीदार सुधा पाठक साक्षी देण्यावरून मागे फिरल्या आणि त्यांनी कोर्टात सांगितलं की आम्हाला आसाराम बापूबद्दल काहीच माहिती नाही.

- 12 जुलै 2015रोजी क्रिपालसिंग या साक्षीदारची हत्या शहाजहानपूरमध्ये करण्यात आली.

- 7 एप्रिल 2018रोजी जोधपूर कोर्टात दोन्ही पक्षांचे युक्तीवाद संपले. आणि आज 25 एप्रिल रोजी त्याच्या शिक्षेवर कोर्टात सुनावणी झाली.

 

First published: April 25, 2018, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading