महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा बाबा रामदेव यांना इशारा

महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा बाबा रामदेव यांना इशारा

जितेंद्र आव्हाड यांनी सानपाडा येथील पतंजलीच्या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली.

  • Share this:

सानपाडा, 20 नोव्हेंबर : योगगुरू बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत बाबा रामदेव यांना इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सानपाडा येथील  पतंजलीच्या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. 'बाबा रामदेव यांनी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी संबोधित करणे अत्यंत चुकीचं असून हे अजिबात खपवून घेणार नाही. रामदेव बाबांनी लवकरात लवकर माफी मागितली नाहीतर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही', अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

तसंच, बाबा रामदेव यांनी  72 तासात या प्रकरणावर माफी मागितली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने समजवून सांगू, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत रामदेव बाबा यांनी, ईश्वर मानणारे मूर्ख असतात असे म्हणणारे पेरियार यांचे अनुयायी वाढत आहेत. पेरियार यांचे अनुयायी ईश्वराला सैतान म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक देश, एक कायदा, जातीमुक्त भारत, समानता न्याय या संकल्पांचा मी चाहता आहे. मात्र, महापुरूषांचे अनुयायी खतरनाक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये देखील मूलनिवासी ही संकल्पना राबवणारे लोक आहेत. मी भेदभाव पाळत नाही. मी दलितांना आचारी, संन्यासी बनवलं. शिक्षणसंस्थेचं प्रमुख केलं. पण आता दुरावा निर्माण केला जात आहे. वैचारिक दहशतवादाविरोधात देशात कायदा व्हायला हवा, अशा प्रकारचे लिखाण सोशल मीडियातून हटवायला हवं.' असं म्हटलं होतं.

त्यानंतर देशभरात त्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही बाबा रामदेव यांच्याविरोधात भडका उडाला. ट्विटरवर बाबा रामदेव आणि पतंलजीविरोधात #ShutdownPatanjali, #ArrestRamdev, #BycottPatanjaliProducts #पतंजलीकाबहिष्कार असं हॅशटॅग ट्रेंड झाले होते.

===============================

Published by: sachin Salve
First published: November 20, 2019, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading