नवी दिल्ली, 20 एप्रिल : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्याने अनेकांना नैराश्य आलं आहे. या संकटातून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी स्पाइसजेट कंपनीने जेट एअरवेजचे 500 कर्मचारी आणि 100 वैमानिकांना कामावर घेतलं आहे.
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कामावर घेण्याचं आमचं धोरण आहे, असं स्पाइसजेटने म्हटलं आहे. याआधीच 100 वैमानिक, 200 केबिन कर्मचारी आणि त्यासोबतच 200 तंत्रज्ञांना आम्ही कामावर घेतलं आहे, अशी माहिती स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी दिली.
कर्मचाऱ्यांची निदर्शनं
जेट एअरवेजच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यवस्थापनाच्या विरोधात निदर्शनं केली होती. या कंपनीने विमानांची उड्डाणं बंद केल्यानंतर आमचं भवितव्य काय, असा प्रश्न ते विचारत आहेत.
जेट एअरवेज आर्थिक संकटात सापडल्यानंतर 400 वैमानिकांनी दुसऱ्या एअरलाइन्समध्ये नोकरी शोधली. तरीही सध्या जेट एअरवेजमध्ये 1300 पायलट्स आहेत, असं एका वरिष्ठ वैमानिकाने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं. सुमारे 40 इंजिनिअर्सनीही याआधीच जेट एअरवेज सोडलं आहे.
27 विमानं 'स्पाइसजेट'च्या ताफ्यात
स्पाइसजेट ने जेट एअरवेजची 27 विमानं आपल्या ताफ्यात दाखल करून घेतली आहेत. कर्जाच्या खाईत अडकलेल्या या कंपनीने याआधीच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा बंद केली आहे.
जेटची सेवा बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना विमानप्रवासाचं तिकीट मिळवून देण्यासाठीही स्पाइसजेट प्रयत्न करत आहे.
1.2 अब्ज डॉलर्सचं कर्ज
जेट एअरवेजवर 1.2 अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. या कर्जातून कंपनीला बाहेर काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया प्रयत्न करत आहे.
जेटची विमानं सध्या बंद असल्याने त्यांच्या टेक ऑफ आणि लँडिंगची धावपट्टीची जागा दुसऱ्या कंपन्यांना देण्यात यावी यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. याचा फायदा एअर इंडियाला मिळू शकतो.
जेटची सेवा बंद पडल्यामुळे मध्येच खोळंबलेल्या प्रवाशांसाठी एअर इंडियाने विशेष तिकीट दर ठेवले होते.
======================================================================================================
VIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजितदादांची फटकेबाजी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jet Airways, Spicejet, Unemployment