बिहारच्या ‘कुरुक्षेत्रावर’ नवं महाभारत, वाग्बाणांनी घायाळ नितीश यांच्याकडून प्रशांत किशोर यांची हकालपट्टी

बिहारच्या ‘कुरुक्षेत्रावर’ नवं महाभारत, वाग्बाणांनी घायाळ नितीश यांच्याकडून प्रशांत किशोर यांची हकालपट्टी

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात वादाची ठिणगी पडली. प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात सातत्यानं नितीश कुमार यांच्यावर वाग्बाण सोडून राजकीयदृष्या घायाळ करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर नितीश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारत प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी केलीय.

  • Share this:

बिहार, 29 जानेवारी: बिहारच्या कुरुक्षेत्रावर सध्या नवं महाभारत सुरु आहे. बंडखोर नेते, संयुक्त जनता दल उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि सरचिटणीस पवन वर्मा यांची पक्षातून अखेर हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षानं दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांना काही वर्षांपूर्वीच पक्षात घेण्यात आलं. त्यांना उपाध्यक्षही बनवण्यात आलं. पण नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात वादाची ठिणगी पडली. प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात सातत्यानं नितीश कुमार यांच्यावर वाग्बाण सोडून राजकीयदृष्या घायाळ करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर नितीश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारत प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

नितीश कुमारांना खोचक शुभेच्छा!

प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत भाजपवर टीकेचे आसूड ओढायला सुरुवात केली होती. भाजप आणि जदयूच्या युतीवरही या दोन्ही नेत्यांना आक्षेप होता. दरम्यान अमित शाहा यांच्याच सांगण्यावरून आपण प्रशांत किशोर यांना पक्षात घेतल्याचं नितीश कुमार यांनी सांगितल्यानंतर दोघांमधल्या वादाचा भडका उडाला. प्रशांत किशोर यांनी Twitter वरून नितीश कुमार खोटं बोलत असल्याचं सांगत टीकेची झोड उठवली. अखेर 20 तासांच्या आत पक्षानं प्रशांत किशोर यांच्यावर कारवाई करत घरचा रस्ता दाखवलाय. दरम्यान पक्षातून हकालपट्टी होताच प्रशांत किशोर यांनी ट्विटरवरून नितीश कुमारांचे आभार मानलेत. एवढंच नाही तर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी खोचक शुभेच्छा देत देव तुमचं भलं करो असा टोमणा मारलाय.

CAA वरून पडली वादाची ठिणगी

प्रशांत किशोर यांनी सीएए आणि एनआरसीवरून केंद्र सरकार आणि नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केलेल्या विरोधाबद्दल त्यांचे आभार मानले होते. सातत्यानं पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या प्रशांत किशोर यांना नितीश कुमारांनी सुचनावजा इशारा दिला होता. तरीही  प्रशांत किशोर यांची वक्तव्य थांबत नव्हती. त्यामुळे पक्षातून कारवाईसाठी दबाव वाढत होता. शेवटी थेट नितीश कुमार यांच्यावरच वैयक्तीक टीका झाल्यानं कारवाई करण्यात आली.

प्रशांत किशोर तृणमूलच्या वाटेवर?

प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिकेमुळे ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या जवळ जात असल्याची जोरदार चर्चा पश्चिम बंगालच्या राजकारणात रंगली आहे. जदयूमधून हकालपट्टी झालेले प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसचा पर्याय निवडू शकतात अशी चर्चा सुरु आहे. तृणमूलच्या नेत्यांनी याला दुजोरा दिला नसला तरी गेल्या काही दिवसांपासून तृणमूलसाठी निवडणुकीची रणनिती आखण्याचं काम प्रशांत किशोर करताहेत. शिवाय त्यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चांगले संबंध असल्यानं चर्चांना अधिकच बळ मिळतंय.

First published: January 29, 2020, 8:43 PM IST

ताज्या बातम्या