बाप चालला होता मुलाला मारायला, आईने लेकराला वाचवलं आणि कुंकू पुसलं!

बाप चालला होता मुलाला मारायला, आईने लेकराला वाचवलं आणि कुंकू पुसलं!

दारूच्या नशेत अजयने आपल्या लहान मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

जशपूर, 05 मार्च : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं नेहमी म्हटलं जातं ते उगाच नाही. आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते आणि काय नाही याचं जिवंत उदाहरण छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील एका गावात पाहण्यास मिळालं. एका तरुणाच्या खुनाचं गुढ उकलून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील पत्थलगावातील बिलाईटांगर परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर एका तरुणाचा अर्धनग्न अवस्थेत  मृतदेह मागील आठवड्यात मंगळवारी आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, त्याच्या पत्नीनेच या तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं. हत्येचं कारणही धक्कादायक आहे. डॉग स्कॉडच्या मदतीने पोलिसांनी या महिलेला अटक केली.

हत्या झालेल्या तरुणाचं नाव अजय पुरी गोस्वामी आहे. त्याची पत्नी सुकन्या गोस्वामी हीने त्याची हत्या केली असून तिला अटक करण्यात आली आहे. अजयचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांची चौकशी केली. त्यावेळी अजय आणि सुकन्यामध्ये कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आणि गुन्हाचा छडा लागला.

पोलिसांनी सांगितलं की,  सुकन्याने आपल्या पती अजयची हत्या केल्याचं कबूल केलं आहे.  अजय हा दारू पिण्याच्या आहारी गेला होता. त्यामुळे घरी नेहमी किरकोळ कारणावरुन वाद व्हायचा. हा वाद कधी कधी इतका विकोपाला जायचा की, तो पत्नीला बेदम मारहाणही करायचा. एवढंच नाहीतर अजय हा आपल्या मुलाला सुद्धा मारहाण करायचं. अजयचा हा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालत होता. तो पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेऊ लागला होता. सोमवारी पुन्हा एकदा अजय आणि सुकन्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. दारूच्या नशेत अजयने आपल्या लहान मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केला. पण, सुकन्याने वेळीच धाव घेऊन त्याला रोखलं आणि या झटापटीत सुकन्याने टॉवेलने अजयचा गळा आवळला. यात अजयचा तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे 3 वाजता सुकन्याने त्याचा मृतदेह हा फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणी सुकन्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

First published: March 5, 2020, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading