श्रीनगर, 01 जानेवारी: जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) प्रसिद्ध माता वैष्णो देवी मंदिरात (Vaishno Devi Shrine Stampede)झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जण ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेले 12 जण चार वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सामुदायिक आरोग्य केंद्रातील ब्लॉक मेडिकल ऑफिसर गोपाल दत्त यांनी सांगितले की, कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. जखमींना बाहेर काढून नारायणा रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, मृतांमध्ये 1 जण जम्मू-काश्मीरचा आहे. बाकीचे दिल्ली, हरियाणा, पंजाबचे रहिवासी आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
Reasi, J&K | Vaishno Devi yatra resumes following a brief suspension after 12 people lost their lives in a stampede incident in Katra pic.twitter.com/n2xZO2wuj9
— ANI (@ANI) January 1, 2022
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्रिकुटा टेकडीवरील मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील गेट क्रमांक तीनजवळ चेंगराचेंगरी झाली. अधिका-यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या सुरुवातीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. श्राइन बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी घटनास्थळी आहेत.
अधिका-यांनी सांगितले की चेंगराचेंगरीत 12 लोक मरण पावले आणि त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी कटरा बेस कॅम्पमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. आणखी 13 जण जखमी झाले असून त्यापैकी बहुतेकांवर माता वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीएम मोदी, राहुल गांधी यांनी व्यक्त केला शोक
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले- माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्याने मला खूप दु:ख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना. या घटनेनंतर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रक्कम दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. त्याचबरोबर जखमींना 50 हजार रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहेत.
"Very distressed to know that an unfortunate stampede claimed lives of devotees at Mata Vaishno Devi Bhavan," President Ram Nath Kovind expresses condolences over the stampede incident at Katra that claimed 12 lives pic.twitter.com/S2ajLMmy6V
— ANI (@ANI) January 1, 2022
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललं झालं. त्यांना या घटनेची माहिती दिली. पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आज झालेल्या चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव (गृह) आणि एडीजीपी, जम्मू आणि विभागीय आयुक्त, जम्मू हे सदस्य असतील. माता वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे आपल्याला खूप दुःख झाल्याचे सिन्हा म्हणाले. मृतांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या अपघातावर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
कसा घडला अपघात
जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी माहिती दिली की, चेंगराचेंगरीची ही घटना शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री 2.45 च्या सुमारास घडली. या घटनेशी संबंधित काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोमधून मंदिर परिसराची परिस्थिती पाहता येत आहे. काही वादावादीनंतर लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, New year