गेल्या 5 महिन्यात लष्कराने केला 86 दहशतवाद्यांचा खात्मा, मोहीम सुरूच राहणार

गेल्या 5 महिन्यात लष्कराने केला 86 दहशतवाद्यांचा खात्मा, मोहीम सुरूच राहणार

या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते.

  • Share this:

नवी दिल्ली 20 मे :  जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेली धडक मोहीम जोरात सुरू आहे. 2019 मध्ये म्हणजे गेल्या 5 महिन्यात तब्बल 86 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लष्कराने आज दिली. लष्कराच्या नॉदर्न कमांडचे प्रमुख रणबीर सिंग यांनी ही माहिती दिली. यापुढेही अतिरेक्यांची ही मोहिम सुरूच राहणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहिम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहिम सुरू आहे. 'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहिम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळी आहे.

या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.

लष्करी तळावर हवाई हल्ल्याची शक्यता

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे हवाई दलाच्या तळांचे नकाशे सापडल्याने अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. भारताच्या बालाकोट इथल्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी मोठा हल्ला घडविण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती गुप्तचर संस्थांनाही मिळाली होती.

सुरक्षा दलांनी गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये काही अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून हवाई दलाच्या दोन तळांचे नकाशे जप्त करण्यात आले होते. श्रीनगर आणि अवंतीपूर इथल्या तळांचे हाताने काढलेले नकाशे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

या घटनेची दखल सुरक्षा दलांनी गांभीर्याने घेतली असून दहशतवाद्यांची हल्ल्याची योजना हाणून पाडण्यासाठी सर्व काळजी घेण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर पोलीस, निमलष्करी दलं आणि लष्करांच्या सर्व विभागांमध्ये समन्वय असून सर्व माहितीचं विश्लेषण आणि उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहितीही लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 03:29 PM IST

ताज्या बातम्या