जालियनवाला हत्याकांड : 'मी इथे बंदुकांच्या 1650 फैरी झाडल्या'

जालियनवाला हत्याकांड : 'मी इथे बंदुकांच्या 1650 फैरी झाडल्या'

पंजाबमध्ये ब्रिटिशांनी घडवलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 99 वर्षं पूर्ण होत आहेत. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या या अमानुष घटनेचे व्रण अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनावर आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : पंजाबमध्ये ब्रिटिशांनी घडवलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 99 वर्षं पूर्ण होत आहेत. जालियनवाला बाग म्हटलं की आपल्याला आठवतो तो जनरल डायर आणि त्याने या बागेत घडवलेला अमानुष गोळीबार.

13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या या अमानुष घटनेमुळे भारत हादरला होता. या घटनेचे व्रण अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनावर आहेत.

ब्रिटिशांविरुद्धच्या असंतोषाने तेव्हा पंजाब धुमसत होता. ब्रिटीश सरकार हे ओळखून होतं. म्हणूनच अमृतसरमध्ये लोकांना एकत्र जमण्याची बंदी घालण्यात आली होती. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली होती. या दोन नेत्यांच्या सुटकेसाठी शांततेने आंदोलन करायचं ठरलं होतं.

रक्तरंजित बैसाखी

13 एप्रिलच्या दिवशी शीख बांधव बैसाखीचा सण साजरा करतात. याच सणाच्या दिवशी जालियनवाला बागेत वेगवेगळ्या गावखेड्यांतून आलेले हजारो स्त्री पुरुष जमले होते. याच वेळी ब्रिटिश सरकारच्या विरोधात इथे शांततेनं निदर्शनं करण्याची योजना होती.

या बागेत एवढे लोक जमा झाल्याची बातमी जनरल डायरला कळली तेव्हा तो शीख, गुरखा, बलुचि आणि राजपूत तुकड्यांना घेऊन तिथे पोहोचला. जोपर्यंत तुमच्याकडच्या गोळ्या संपत नाहीत तोपर्यंत गोळीबार करा, असे आदेश त्याने सैनिकांना दिले.

डायरच्या 50 पोलिसांनी नि:शस्त्र जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार सुरू झाल्यानंतर तिथे जमलेले लोक सैरावैरा बागेच्या प्रवेशद्वाराकडे धावत सुटले. बागेचं एकच प्रवेशद्वार उघडं होतं. त्या दिशेने सुटकेसाठी पळत जाणाऱ्या लोकांवर हा गोळीबार सुरूच राहिला.

मौत का कुआँ

जे लोक बाहेर पडले ते वाचले पण काही लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी एका विहिरीत उड्या घेतल्या. या विहिरीतूनच नंतर १२० मृतदेह काढण्यात आले. जनरल डायरच्या शिपायांनी महिला आणि मुलांवरही गोळीबार केला. या हत्याकांडात एक हजार जणांचा मृत्यू ओढवला आणि 1500 च्या वर लोक जखमी झाले.

स्वातंत्र्याची ठिणगी

भारतीयांचा लढा दडपण्यासाठीच जनरल डायरने या जुलमी गोळीबाराचा अवलंब केला पण या घटनेनंतर सगळे देशवासीय पेटून उठले आणि त्यांनी हे ब्रिटिशांचं सरकार उलथवून लावण्याचा निर्धार केला. यानंतरच महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतात असहकाराची चळवळ सुरू झाली.

डायरचा अहवाल

जालियनवाला बागेतल्या गोळीबारानंतर दुसऱ्या दिवशी जनरल डायरने ब्रिटिश सरकारला एक अहवाल सादर केला होता. माझ्या तुकड्यांनी इथे बंदुकांच्या 1650 फैरी झाडल्या, असं त्याने या अहवालात म्हटलं होतं.

या हत्याकांडातल्या मृतांचा अधिकृत आकडा ३०० ते ४०० एवढाच दाखवण्यात आला होता.पण स्वातंत्र्यलढ्यातल्या सेवा समितीने मृत्युमुखी पडलेल्यांची आणि जखमींची संख्या जाहीर केली. यात मृतांचा आकडा एक हजारावर पोहोचला होता आणि १५०० हून अधिक लोक जखमी होते. काहीजणांच्या मते हे आकडे याहूनही अधिक होते.

डायरवर कारवाई नाही

जनरल डायरच्या या कृत्याबद्दल आधी ब्रिटिश सरकारमधले काही लोक त्याला पाठिशी घालत होते पण त्यानंतर ब्रिटनच्या प्रतिनिधीगृहाने जनरल डायरवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. डायरने आपली निवृत्ती जाहीर केली. त्याला भारतात येण्यासाठीही प्रतिबंध करण्यात आला.

इतकं अमानुष कृत्य घडवूनही ब्रिटिश सरकारने जनरल डायरवर तीव्र स्वरूपाची कोणतीच कारवाई केली नाही. याचा निषेध करण्यासाठी कवी रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी त्यांना दिलेला सर हा किताब परत केला.

महात्मा गांधींची पंजाब भेट

या घटनेनंतर महात्मा गांधीजींना पंजाब प्रांतात जाऊन ब्रिटिशांचे अत्याचार सोसत असलेल्या देशवासियांची भेट घ्यायची होती. पण त्यांना अनेक वेळा परवानगी नाकारण्यात आली. अखेर सहा महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधी पंजाबला जाऊ शकले.

जालियनवाला बाग हत्याकांड घडलं त्याच्या काही वर्षं आधीच महात्मा गांधीजी भारतात आले होते. त्यांनी रौलेट कायद्याला विरोध करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनामुळेच भारतीय जनता ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध पेटून उठली होती. इतका अमानुष हिंसाचार घडवूनही ब्रिटिश सरकार भारतीय स्वातंत्र्यवीरांचं आणि सामान्य नागरिकांचं खच्चीकरण करू शकली नाही.

पंजाबच्या या जालियनवाला बागेमध्ये स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या भारतीयांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येकाच्याच मनाच स्वातंत्र्यज्योत तेवते आहे.

===================================================================================================================================================================

VIDEO: मनेका गांधी यांचं आक्षेपार्ह वक्तव्य; मुस्लिमांना उद्देशून म्हणाल्या, मतं द्या नाहीतर...

First published: April 12, 2019, 11:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading