जैश-ए-मोहम्मदला घडवायचा होता पुलवामासारखा दुसरा दहशतवादी हल्ला?

जैश-ए-मोहम्मदला घडवायचा होता पुलवामासारखा दुसरा दहशतवादी हल्ला?

या सर्व घडामोडींदरम्यान, 24 फेब्रुवारीच्या कुलगाम चकमकीत ठार करण्यात आलेल्या 'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी रकीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 02 मार्च : काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारतीय लष्कराकडून तीव्र स्वरुपात मोहीम राबवली जात आहे. दहशतवादविरोधातील कारवाईदरम्यान भारतीय लष्कराकडून मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना यमसदनी धाडले जात आहे. यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान सैरभेर झाला आहे. बिथरलेल्या पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहेत.

या सर्व घडामोडींदरम्यान, 24 फेब्रुवारीच्या कुलगाम चकमकीत ठार करण्यात आलेल्या 'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी रकीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ चकमकीपूर्वीचा आहे. 'जैश-ए-मोहम्मद'नंच हा व्हिडीओ जारी केल्याचे म्हटले जाते आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने ज्यापद्धतीनं 14 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणला, त्याच पद्धतीनं राकीबदेखील दुसरा दहशतवादी हल्ला घडवण्याचा तयारीत होता, असे या व्हिडीओद्वारे सूचित होत आहे.

नेमके काय आहे व्हिडिओ?

'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी राकीब आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार असल्याचे या व्हिडीओमध्ये सांगत आहे. ''काश्मीर खोऱ्यात होणाऱ्या चकमकींमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले जात आहेत. पण काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 'जैश-ए-मोहम्मद'कडून आत्मघातकी हल्ले घडवले जातील'', अशी गरळ त्यानं या व्हिडीओद्वारे ओकली आहे.

ज्या भागामध्ये भारतीय लष्कराकडून मोहीम राबवली जात आहे, तेथे आमचे दहशतवादी सुरक्षा दलाच्या जवानांना अधिक नुकसान पोहोचवू शकत नाहीत. पण आत्मघातकी हल्ला करताना कोणतेही अडथळे येत नसल्याने भारतीय लष्कर आणि अन्य सुरक्षा यंत्रणांची यामुळे प्रचंड प्रमाणात हानी होते. सुरक्षा दलाच्या जवानांकडून आत्मघातकी हल्ले थांबवले जाऊ शकत नाहीत. आत्मघातकी हल्ले घडवण्यासाठी जैश-ए-मोहम्मद संघटनेकडे दहशतवादी असून काश्मीरला लवकरच स्वातंत्र्य मिळणार आहे, अशी बाष्फळ बडबडही त्यानं व्हिडीओमध्ये केली होती.

...अन् राकीबचा डाव हाणून पाडला

दरम्यान, 'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी राकीबचा डाव भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. 24 फेब्रुवारीला कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत राकीबसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दुसरीकडे, या चकमकीत डीएसपी अमान ठाकुर यांच्यासहीत भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले होते.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

====================

First published: March 2, 2019, 6:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading