दिल्ली, 28 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धक्का बसला. कारण, जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली. त्याकरता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारतानं मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली होती. या हल्ल्यानंतर अमेरिकेनं देखील भारतासोबत असल्याचं सांगितलं होतं. शिवाय, पाकिस्तानला देखील दहशतवादाच्या मुद्यावरून खडसावलं होतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चीननं देखील भारताला या मागणीला पाठिंबा दिला होता.
त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघातमध्ये मांडला गेलेला प्रस्ताव हा भारताचा मोठा राजनैतिक विजय आहे. दरम्यान, आता हा प्रस्ताव मंजूर होणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
दोन्ही देशांमध्ये तणाव
पुलवामा हल्ल्याची जबाबादारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली. त्यानंतर भारतानं आता परिणाम भोगायला तयार राहा असा इशारा दिला. शिवाय, 26 फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक करत पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले.
त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसण्याचा केलेला प्रयत्न भारतीय वायू दलानं हाणून पाडला. सध्या भारताचा पायलट हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मागील दोन दिवसांमधील घडामोडी पाहता दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे.
पायलटची सुटका होणार?
'परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी केलं आहे. पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.
शांतता राखा
दरम्यान, दोन्ही देशांमधील वाढता तमाव पाहता फ्रान्स आणि चीननं भारत - पाकनं शांतता राखावी आणि चर्चेतून प्रश्न सोडवावेत असं म्हटलं आहे.
SPECIAL REPORT : पाकिस्तान करू शकतो अण्वस्त्रांचा वापर?