01 एप्रिल : प्रक्षेपणाच्या ४८ तासांच्या आतच 'जीसॅट- ६ ए' या उपग्रहाचा संपर्क तुटला आहे. हा 'इस्रो'साठी मोठा धक्का आहे. या उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च झाले होते. उपग्रहाचं प्रक्षेपण केल्यानंतर 48 तासांनंतर त्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात या उपग्रहाशी संबंध तुटल्याची माहिती इस्त्रोनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरुवारी संध्याकाळी जीएसएलव्ही एफ ०८ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने 'जीसॅट-६ ए' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. हे उपग्रह १० वर्षांपर्यंत सेवा देईल, असे इस्रोने स्पष्ट केले होते. या उपग्रहामुळे सॅटेलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्यूनिकेशन सेवा अधिक प्रभावी होणार होती.
तसेच यामुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होणार होते. 'जीसॅट-६ ए' या उपग्रहाकडे सर्वात मोठा अॅँटेना असून इस्त्रोनेच त्याची निर्मिती केली होती. सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीने हे उपग्रह अत्यंत महत्त्वाचे ठरणार होते. इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहीमेला रविवारी हादरा बसला. शनिवारपासून उपग्रहाशी संपर्क तुटला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा