भारताचं चांद्रयान - 2 सप्टेंबरमध्ये उतरणार चंद्रावर

भारताचं चांद्रयान - 2 सप्टेंबरमध्ये उतरणार चंद्रावर

भारताचं चांद्रयान -2 जुलै महिन्यात अवकाशात झेपावणार आहे. 9 जुलै ते 16 जुलै या काळात चांद्रयानचं लाँचिंग होईल आणि सप्टेंबर महिन्यात हे यान चंद्रावर उतरेल, अशी अपेक्षा आहे.

  • Share this:

बंगळुरू, 2 मे : भारताचं चांद्रयान -2 जुलै महिन्यात अवकाशात झेपावणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो' ने ही घोषणा केली आहे.

इस्रोचे संशोधक गेली तीन वर्षं चांद्रयान -2  मोहिमेवर मेहनत घेत आहेत. आता 9 जुलै ते 16 जुलै या काळात चांद्रयानचं लाँचिंग होईल आणि सप्टेंबर महिन्यात हे यान चंद्रावर धडकेल, अशी अपेक्षा आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरवण्याचा 'इस्रो'चा मानस आहे.  या मोहिमेत चंद्रावर उतरणारं लँडर, ऑरबिटर आणि रोव्हरचा समावेश आहे.

GSLV Mk-III या रॉकेटच्या मदतीने या यानाचं लाँचिंग होणार आहे. ऑरबिटरद्वारे हे यान चंद्राच्या कक्षेत सोडलं जाईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भागात ते लँड होईल. यान चंद्रावर पोहोचलं की रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल आणि संशोधन सुरू ठेवेल.

चंद्राचा 3 डी नकाशा

याआधी 2008 मध्ये इस्रोने चांद्रयान -1 मोहीम यशस्वी केली होती. या यानाने चंद्रावरच्या हिमकणांचा शोध लावला होता. तसंच चंद्राच्या पृष्ठभागाचा 3 डी नकाशाही बनवला होता. चंद्राचे हाय रिझोल्युशन फोटोही आपल्याला यामुळे मिळाले होते.

आता चांद्रयान -2 हे यान चंद्रावर असलेल्या खनिजांबदद्ल संशोधन करणार आहे. ऊर्जेचा स्रोत मानल्या जाणाऱ्या हेलियमच्या कणांबद्दलही यामध्ये संशोधन होणार आहे.

चांद्रयान - 1 या यानात भारतासह पाच देशांची उपकरणं होती. चांद्रयान -2 मध्ये मात्र भारताचीच उपकरणं असणार आहेत.  त्यामुळे भारताच्य दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.

श्रीहरीकोटाहून उड्डाण

आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटाच्या सतिश धवन स्पेस सेंटरहून या यानाचं लाँचिंग होणार आहे. याआधी एप्रिल महिन्यात हे लाँचिंग होणार होतं पण तांत्रिक गोष्टींच्या पूर्णतेसाठी आणखी थोडा अवधी लागला.

==========================================================================

SPECIAL REPORT : ज्यांच्या नावाने माओवादी घाबरतात, असा घडतो C-60 कमांडो!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या