ISRO करणार आणखी दोन नवे विक्रम, हा आहे 'मेगा प्लान'

ISRO करणार आणखी दोन नवे विक्रम, हा आहे 'मेगा प्लान'

ISROचे हे दोन संकल्प पूर्ण झाले तर भारताच्या अंतराळ संशोधनाला जगात मानाचं स्थान मिळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : भारतीय अंतराळ संशोधन संस्था  ISROने चांद्रयान -2 नंतर आणखी दोन नवे संकल्प सोडले आहेत. चांद्रयान -2 साठी 15 जुलैला यान झेपावणार आहे. या मोहिमेनंतर ISROने आणखी दोन नव्या महत्त्वाकांक्षी मोहिमा राबविणार आहे. ISRO चे प्रमुख के सिवन यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. अवकाशात भारताचं अंतराळस्थानक उभारणं आणि मानवी उपग्रह पाठवणं असे दोन संकल्प ISROने सोडले आहेत.

2022मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंतराळात ISRO मानवी उपग्रह पाठविणार आहे. आत्तापर्यंतच्या सर्व मोहिमा या मानवरहित उपग्रहाच्या होत्या. 2022पूर्वी अंतराळवीर घेऊन उपग्रह अवकाशात झेपावेल असं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी सांगितलं. भारताची ही महत्त्वाकांक्षी मोहीम असणार आहे.

अंतराळात स्थानक उभारण्याची डेडलाईन मात्र ISROने दिली नाही. त्याला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका, रशिया, चीन अशा मोजक्याच देशांची अंतराळात स्थानके आहेत. तिथे अंतराळवीर राहून सतत अभ्यास करत असतात. असं स्थानक उभारणं हे प्रचंड खर्चिक आणि अतिशय प्रगत तंत्रज्ञाना लागणारं काम आहे. मात्र ISROने आत्तापर्यंत अनेक गोष्टी मिळवल्या असून हे कामही आम्ही फत्ते करू असं सिवन यांनी सांगितलंय.

चांद्रयान-2 ची तयारी पूर्ण

भारताच्या चांद्रयान - 2 मोहिमेची तयारी पूर्ण होत आली आहे. या मोहिमेचं लाँचिंग 15 जुलैला करण्यात येणार आहे. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे दोन महिला संशोधकांकडेच त्याचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

प्रोजेक्ट डायरेक्टर एम. वनिता आणि मिशन डायरेक्टर रितु करिधल या महिला संशोधकांवर मोहिमेची धुरा असेल. याआधीही इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये महिलांनी मोलाची भूमिका बजावली होती.

३० टक्के महिला संशोधक

आम्हाला या मोहिमेसाठी तज्ज्ञ संशोधकांची निवड करायची होती. मग त्यात महिला किंवा पुरुष असा काही निकष नव्हता. पण निवड झालेल्या संशोधकांमध्ये महिलांनी बाजी मारली आहे, असं इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितलं. चांद्रयान - 2 मोहिमेमध्ये 30 टक्के महिला आहेत, असंही ते म्हणाले. 15 जुलैला लाँचिंग झाल्यानंतर हे यान 6 किंवा 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. हे लाँचिंग श्रीहरीकोटाहून पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी होणार आहे.

First published: June 13, 2019, 5:08 PM IST
Tags: isro

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading