धक्कादायक! हैदराबादेत 8 सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची भीती

धक्कादायक! हैदराबादेत 8 सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची भीती

प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली, परंतु याचा रिपोर्ट मिळणं अद्याप बाकी आहे.

  • Share this:

हैदराबाद, 4 मे : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढतोच आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत जगभरातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. रुग्णालयं, ऑक्सिजन बेड्सची कमतरचा भासत असल्याने अनेकांचा मृत्यू होत असून परिस्थिती गंभीर झाली आहे. मनुष्य या कोरोनाशी लढा देत असताना आता कोरोनाची झळ आता प्राण्यांनाही पोहचल्याचं समोर आलं आहे. हैदराबाद प्राणीसंग्रहालयातील तब्बल आठ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना तपासणीसाठी CCMB (सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी) येथे पाठवण्यात आलं होतं. आज त्यांचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.

प्राणीसंग्रहालयातील सफारी पार्कमध्ये सिंहांना मांस न खाणं आणि सर्दी झाल्याच्या तक्रारीवरुन पशुवैद्यकीय पथकाने त्यांचे नमुने घेतले आणि त्यांना तपासणीसाठी पाठवलं होतं. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली, परंतु याचा रिपोर्ट मिळणं अद्याप बाकी आहे. हैदराबादमधील प्राणीसंग्रहालय या महिन्याच्या 2 तारखेपासून जनतेसाठी बंद आहे.

पशुवैद्यकीय पथकाला प्राण्यांच्या देखभालवेळी यांच्यात कोरोनाची लक्षणं भूक न लागणं, नाकातून पाणी येणं, कफ यांसारख्या समस्या आढळल्या होत्या. त्यावरुनच त्यांची टेस्ट करण्यात आली आहे. या प्राणीसंग्रहालयात काम करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

गेल्या एप्रिलमध्ये न्यूयॉर्कमधील प्राणीसंग्रहालयात सिंहाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर हाँगकाँगमध्ये मांजरी आणि कुत्र्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

रिपोर्ट आल्यानंतर हैदराबादमधील या सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यास, सिंहाला कोरोना झाल्याची ही भारतातील पहिलीच घटना ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार, चार मेल आणि चार फिमेल सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: May 4, 2021, 3:39 PM IST

ताज्या बातम्या