युद्धाचे ढग: इराणनं अमेरिकेला चिडवलं; अनेक विमानांचे मार्ग बदलले! Iran | USA | RQ-4 drone| Donald Trump

युद्धाचे ढग: इराणनं अमेरिकेला चिडवलं; अनेक विमानांचे मार्ग बदलले! Iran | USA | RQ-4 drone| Donald Trump

शक्तिशाली MQ-4C ट्राइटन ड्रोन पाडल्यानंतर इराणने आता त्याचे फोटो प्रसिद्ध करून पुन्हा एकदा अमेरिकेला चिडवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

तेहराण/वॉशिंग्टन, 21 जून: शक्तिशाली MQ-4C ट्राइटन ड्रोन पाडल्यानंतर इराणने आता त्याचे फोटो प्रसिद्ध करून पुन्हा एकदा अमेरिकेला चिडवण्याचा प्रयत्न केला आहे. इराण(Iran)च्या एका वृत्तवाहिनीने शुक्रवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यात अमेरिकेच्या ड्रोनचे अवशेष दाखवण्यात आले आहेत. इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी थेट हल्ला करण्याचे आदेश दिले होते. पण हल्ल्याच्या आधी त्यांनी तो आदेश मागे घेतला होता. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे मध्य पूर्व आशियामध्ये युद्धाचे ढग जमा झाले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक आंतरराष्ट्रीय विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांनी इराण आणि त्याच्या आजूबाजूने जाणाऱ्या विमान सेवा रोखल्या आहेत. दुसरीकडे अमेरिकेने इराणला लष्करी कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

न्यूयाॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लढाऊ विमाने इराणच्या दिशेने गेली देखील होती. पण क्षेपणास्त्रे टाकण्याआधी ट्रम्प यांनी आदेश मागे घेतले. अर्थात अध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय अचानक कसा काय बदलला याबद्दल काहीच माहिती समोर आली नाही. यासंदर्भात ट्रम्प रात्री उशीरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते असे कळते. दरम्यान, मेल ऑनलाईनने दिलेल्या बातमीनुसार ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. पण इराणने हा प्रस्ताव फेटाळून लावला. ट्रम्प यांनी आम्हाला युद्ध नको आहे तर कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी असल्याचे कळवले होते. यासंदर्भात इराणमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी अतिशय कमी वेळ दिला होता. याबाबतचा अंतिम निर्णय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई हेच घेतील.

'तुम्ही मोठी चूक केली', ट्रम्प यांच्या इशाऱ्याने मध्य पूर्व आशियात युद्धाचे ढग!

दोन वेळा इशारा दिला आणि मग पाडले ड्रोन

ड्रोनचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर इराणने हे देखील स्पष्ट केले की ओमान खाडीवर उडणाऱ्या अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रेन पाडण्याआधी दोन वेळा इशारा दिला होता. इराणच्या हवाई दलाचे ब्रिगेडियर जनरल इमिराली हजीजादे यांनी सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही दोन वेळा त्यांना इशारा दिला होता. मानवरहित विमानात इशारा ऐकण्याची आणि हजारो किलो मीटर दूर असलेल्या अमेरिकेत बसलेल्या लोकांना हा इशारा देण्याची यंत्रणा असते. पण ड्रोनकडून तसा कोणताही संधेस आला नाही. आम्ही पहाटे 3.55 वाजता पुन्हा एकदा विनंती केली. तेव्हा देखील ड्रोनने मार्ग बदलला नाही. अखेर पहाटे 4.05 मिनिटांनी ड्रोन पाडण्यात आले. इराणच्या हवाई हल्ल्यात प्रवेश केल्यामुळेच ड्रोन पाडण्याचे आदेश दिल्याचे हजीजादे यांनी सांगितले.

इराण पाडू शकते प्रवासी विमान

मध्य पूर्व आशियात युद्धाचे ढग जमा होत आहेत असे दिसत असताना अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी त्यांच्या विमान सेवेचे मार्ग बदलले आहेत. अमेरिकेच्या युनायटेड एअरलाईन्सने न्यूयॉर्कहून मुंबईला एका विमानाचे उड्डाणच रद्द केले. हे विमान इराण मार्गे भारतात येणार होते. पण सुरक्षेच्या कारणामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

युद्ध झाले तर रशिया इराणच्या बाजूने...

अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या तणावात जगाचे दोन भाग होत असल्याचे दिसून येत आहे. तणाव अमेरिका आणि इराणमध्ये असले तरी प्रत्यक्षात अमेरिका आणि रशिया समोरा-समोर आले आहेत. रशियाने तर आधीच स्पष्ट केले आहे की जर अमेरिकेने कारवाई केली तर मोठे नुकसान होऊ शकते. त्याच सौदी अरबने इराणविरोधी भूमिका घेतली आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन इराणच्या जवळचे मानले जातात.

भारताने तैनात केल्या दोन युद्ध नौका

अमेरिका आणि इराणच्या या तणावात भारताने खबरदारी म्हणून दोन युद्ध नौका तैनात केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी इंधनाच्या टॅकरवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने या युद्धनौका तैनात केल्या आहेत. अर्थात भारताचे नौदल युद्धासाठी नाही तर व्यवसायिक जहाज आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

शेअर बाजारावर झाला परिणाम

आखाती देशातील या तणावामुळे शेअर बाजारात देखील मंदी आली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स आणि राष्ट्रीय निर्देशांक अर्थात निफ्टीत घसरण झाली आहे. विशेषत: तेल कंपन्यांचे शेअर कोसळले आहेत.

वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेतानाच अभिजीत बिचुकलेचा EXCLUSIVE VIDEO

First published: June 21, 2019, 9:58 PM IST

ताज्या बातम्या