मुंबई, 15 जुलै : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इकबाल कासकरनं (Iqbal Kaskar) पोलीस चौकशीत दाऊदच्या तब्येतीबाबतची अत्यंत गोपनिय माहिती (Secret information) उघड केली आहे. ड्रग्ज तस्करी (Drugs peddling) प्रकरणात कासकरचं नाव समोर आल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केली आहे. त्या चौकशीतून अऩेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
दाऊदबाबत काय म्हणाला कासकर?
दाऊदला गंभीर आजार आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, या सर्व अफवा असून दाऊदची तब्येत एकदम ठणठणीत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. तो दररोज आपल्या फिटनेससाठी बॅडमिंटन खेळत असल्याची माहितीदेखील त्यानं दिली आहे. दाऊद आणि छोटा शकील हे दोघं पाकिस्तानातून भारतात ड्रग्ज तस्करीचा व्यवसाय करत असल्याचंही या चौकशीतून समोर आलं आहे.
ड्रग्ज तस्करीशी कासकरचा संबंध
भारतात मोठ्या प्रमाणावर येणारे अंमली पदार्थ हे अफगाणिस्तानातून पाकव्याप्त काश्मीरमार्गे भारतात येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्याबाबत अधिक चौकशी केली असता इकबाल कासकरचं या भागात नेटवर्क सक्रिय असून त्याचा वापर करूनच हे तस्कर भारतात ड्रग्ज आणत असल्याचं समोर आलं. त्यानंतर याची अधिक माहिती घेण्यासाठी एनसीबीनं कासकरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
कासकरच्या चौकशीतून समोर आलेल्या नावांची एक यादीच तयार केली असल्याचं एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर आणि अजमेर या दोन वेगवेगळ्या भागातून ते दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचत असल्याचंही तपासातून समोर आलं आहे. ही तस्करी कुठल्याही मोठमोठ्या वाहनांमधून न होता चक्क दुचाकीवरून केली जाते. हौशी पर्यटक असल्याचं भासवत हे दुचाकीस्वार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ड्रग्ज पोहोचवत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे वाचा - दक्षिण आफ्रिकेत बेबंदशाही! 72 लोकांनी गमावले आपले प्राण; भर शहरात हिंसाचार
कासकरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपाड्यातून एका महिलेला अटक केली आहे. हुसैन बी नावाची ही महिला जम्मू काश्मीरमधून ड्रग्जची तस्करी करून ती देशातील इतर भागात पोहोचवत असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dawood ibrahim, Drugs, Pakisatan