Home /News /national /

राजकीय नेत्यांना Covid Infected पत्रांचा धोका; भारतासह अनेक देशांना इंटरपोलने दिला इशारा

राजकीय नेत्यांना Covid Infected पत्रांचा धोका; भारतासह अनेक देशांना इंटरपोलने दिला इशारा

राजकीय नेत्यांना कोरोना संसर्गित पत्र पाठवून लक्ष्य करण्यात येऊ शकेल, असं इंटरपोलने दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : जगभरात थैमान घालणाऱ्या नॉव्हेल कोरोना व्हायरस (Coronavirus) आता दहशतीसाठी वापरला जाईल, असा इशारा इंटरपोलने दिला आहे. भारतासह विविध देशांच्या राजकीय नेत्यांना धोका पोहोचवण्यासाठी कोरोनाचा विषाणू वापरला जाऊ शकतो, असा इशारा इंटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशन अर्थात Interpol ने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिला आहे. राजकीय नेत्यांना कोरोना संसर्गित पत्र पाठवून लक्ष्य करण्यात येऊ शकेल, असं यात म्हटलं आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी  यांच्या चेहऱ्यांवर थुंकणे, खोकणे असे प्रकार काही लोक करत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंटरपोलने भारतासह इतर 193 सदस्य देशांमधील राजकीय नेते आणि व्यक्तींना कोविड संसर्ग असलेली पत्रे पाठवण्यात येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा दिला आहे, असं हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. इंटरपोलने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड19 ची लागण झालेल्या व्यक्ती असतील आणि त्या एखाद्याच्या चेहऱ्यावर थुंकत किंवा खोकत असतील तर धोका उद्भवू शकतो. अशाप्रकारे जाणीवपूर्वक खोकणे, थुंकण्याचे प्रकार केले जात असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे इंटरपोलने म्हटले आहे. एखाद्या राजकीय नेत्याला अशाप्रकारे पत्र पाठविण्यात आल्याची घटना घडल्याचे इंटरपोलने स्पष्ट केलेले नाही. अनेकदा प्रवासावर निर्बंध असूनही कोविड १९ बाधित भागातील व्यक्ती जाणीवपूर्वक कोविड १९चा प्रसार नसलेल्या भागात जाते. तसेच कोरोना संसर्ग असलेले जैविक नमुने ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचेही आढळले आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व देशांमधील सुरक्षा एजन्सींनी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात याची यादीही इंटरपोलने दिली आहे.  महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणेला या धोक्यांची माहिती असणे आवश्यक आहे. पोलिसांनी सहकार्य न करणाऱ्या व्यक्तींपासून सांभाळून राहिलं पाहिजे, तसेच पीपीई किटचाही वापर केला पाहिजे. टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांनी पॅकेजेस हाताळताना या जैविक धोक्याची जाणीव ठेवून योग्य ती काळजी घेऊन, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून काम केले पाहिजे, असंही इंटरपोलने म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या अशा धोक्यांबाबत इंटरपोलने या आधीही इशारा दिला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनेही या आधी पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना याबाबत सावध केलं आहे. देशात बनावट हँड सॅनिटायजर्सची विक्री आणि पीपीई कीट तसंच कोविड १९ शी संबधित वैद्यकीय साहित्य विक्रेते बनून फसवणूक करणाऱ्यांचे जाळेच सक्रीय असल्याची सूचना दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकिंग व्हायरस ते रॅन्समवेअर व्हायरस निर्माण करून आर्थिक फसवणूक करणारे आणि covid-19 च्या सुरक्षा उपाययोजनांबाबत दिशाभूल करणारे गुन्हेगारी गट मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचा इशाराही इंटरपोलने दिला आहे.
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या