कोलकता 3 मार्च : भारताच्या बालाकोटमधल्या हवाई हल्ल्यांचा उद्देश हा कुणाला ठार करण्याचा नव्हता तर फक्त भारताची शक्ती दाखवायची होती असं वक्तव्य केंद्रीय मंत्री एस.एस. अहलुवालीया यांनी केलंय. बालाकोटमध्ये किती लोक मारले गेले याचा पुरावा द्या अशी मागणी विरोधकांकडून होत असताना केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय हवाई दलाच्या 26 फेब्रुवारीच्या हल्ल्यात जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय उद्धवस्त झालं होतं त्यात 300 ते 400 अतिरेकी मारले गेल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने भारतीय माध्यमांनी दिलं होतं. मात्र सरकारने किंवा लष्कराकडूनही त्याबाबत अधिकृत माहिती दिली गेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता किती माणसे मेलीत याचा पुरावा द्यावा अशी मागणी केली आहे.
तर लष्कराच्या कामगिरीवर विरोधक आक्षेप घेत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने हल्ल्याचा परिसर सील केला असून तिथे कुणालाही जायला बंदी घालण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गुप्तचर सूत्रांना बॉम्ब हल्ला झाला त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे याची माहिती मिळवायला अडचण जात आहे अशीही माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या मुद्याचं राजकारण सुरू झालं आहे. आम्ही कठोरपणे दहशतवाद्यांना चिरडून टाकलं असं सरकारला दाखवायचं आहे तर सरकार युद्धखोर असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.