Home /News /national /

Weight Lifting: काश्मीरी मुली फक्त सुंदरच नाही शक्तिशालीही असतात, महिला पावर लिफ्टरची प्रेरणादायी कथा

Weight Lifting: काश्मीरी मुली फक्त सुंदरच नाही शक्तिशालीही असतात, महिला पावर लिफ्टरची प्रेरणादायी कथा

काश्मीरमध्ये नुकतंच पार पडलेल्या पावर लिफ्टिंग (Weight Lifting)स्पर्धेमध्ये साइमा उबेद या महिलेनं गोल्ड मेडल जिंकत वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकत साइमा उबेद काश्मीरच्या पहिल्या महिला पावर लिफ्टर (Power Lifter) ठरल्या आहेत.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली 15 फेब्रुवारी : 'कश्मीर की कली' म्हणून सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या काश्मीरी महिला आता शरीर सौष्ठव स्पर्धांसारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांतही आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून देत आहेत. काश्मीरमध्ये नुकतंच पार पडलेल्या पावर लिफ्टिंग (Weight Lifting)स्पर्धेमध्ये साइमा उबेद या महिलेनं गोल्ड मेडल जिंकत वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकत साइमा उबेद काश्मीरच्या पहिल्या महिला पावर लिफ्टर (Power Lifter) ठरल्या आहेत. जास्त वजन वाढलेल्या साइमा यांना त्यांचे पती उबेद हाफिज यांच्याकडून कशी प्रेरणा मिळाली हा प्रवास त्यांनी शेअर केला आहे. एएनआय या वृत्त वाहिनीशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, जिममध्ये जाण्यापूर्वी माझं वजन खूप वाढलं होतं. माझ्या पतीनं मला वजन कमी करण्यासाठी खूप मदत केली. त्यांनी मला प्रशिक्षण दिलं आणि वेटलिफ्टर म्हणून करिअर निवडण्याचा मार्ग दाखवला. जम्मू-काश्मीर पावर लिफ्टिंग असोसिएशननं प्रथमच श्रीनगरमधील महिलांसाठी आयोजित केलेल्या चौथ्या पावर लिफ्टिंग, बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट चॅम्पियनशीपमध्ये 27 वर्षीय साइमा उबेद यांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे. या स्पर्धेमध्ये साइमा उबेद यांनी 255 किलोग्रॅम वजन उचललं. राज्यभरातील महिला या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. साइमा उबेद यांनी आपल्या प्रवासाबद्दल पुढं सांगितलं की, मूल झाल्यानंतरही मी वजन उचलणं सोडलं नाही. लोकांनी सामाजिक दबावाखाली येऊ नये असं आवाहन त्यांनी इतरांना केलं आहे. तसंच, त्यांनी असंदेखील सांगितलं की, समाज काय विचार करेल असा विचार करुन ज्या महिला आपलं स्वप्न पूर्ण करु शकत नाहीत त्यांच्यासाठी मला एक उदाहरण निर्माण करायचं होतं. साइमाचे पती उबेद यांनी सांगितले की, पावर लिफ्टिंगला वजन उचलण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती साइमाकडे नैसर्गिकरित्या होती. मी तिला पावर लिफ्टिंग करण्याची कल्पना दिली आणि तिनं ती मान्य केली. त्यानंतर आम्ही स्पर्धेची तयारी सुरु केली आणि देवाच्या कृपेनं तिनं एक महत्वाचा टप्पा गाठला. साइमा उबेद आणि उबेद हाफिज यांचं 2018 मध्ये लग्न झालं. साइमाला आरोग्याबाबतच्या अनेक समस्या होत्या, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कधीच गर्भधारणा होऊ शकत नसल्याचं सांगितलं होतं. पण त्यानंतर साइमा यांना एक मुलगी झाली सध्या त्यांची मुलगी एका वर्षाची आहे. मूल झाल्यानंतर साइमा यांना मणक्याचा त्रास होऊ लागला आणि डॉक्टरांनी त्यांना वर्कआऊट करु नको, असा सल्ला दिला. पण साइमा यांनी वर्कआऊट करणं थांबवलं नाही. इच्छित उद्दीष्ट मिळवण्यासाठी स्वत:वर काम करा अशी प्रेरणा हे जोडपं सध्या इतरांना देत आहे. तसंच साइमा यांनीदेखील समाजातील सर्व पतींना सल्ला दिला आहे की, तुम्ही तुमच्या पत्नीकडे चांगली मैत्रीण म्हणून बघा. तिला सहकार्य करा आणि तिची काळजी घ्या. तसंच, मुलगा आणि मुलगी यात काही फरक नाही. मुलींनी त्या प्रतिभावंत आहेत हे सिद्ध करुन दाखवलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांची योग्यता सिद्ध सुद्धा केली आहे. फक्त पालकांनी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि फिट राहू दिलं पाहिजे, असं साइमा यांनी सांगितले. साइमा सध्या श्रीनगरमधील महिलांसाठी फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Inspiring story

पुढील बातम्या