इंदिरा गांधींच्या स्मृतिदिनी शेअर केला प्रियांकांचा फोटो, काँग्रेस खासदार ट्रोल

इंदिरा गांधींच्या स्मृतिदिनी शेअर केला प्रियांकांचा फोटो, काँग्रेस खासदार ट्रोल

Indira Gandhi Death anniversary च्याच दिवशी प्रियांका यांचा फोटो ट्वीट करत श्रद्धांजली वाहिल्याने विरोधक आणि टीकाकारांनी या मोठ्या नेत्याला चांगलंच ट्रोल केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झाली. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि काँग्रेसच्या सर्वात कणखर आणि लोकप्रिय नेत्या म्हणून आजही ओळखल्या जातात. त्यांच्या स्मृतिदिनाला प्रियांका गांधी यांचा फोटो शेअर केल्यामुळे काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाले.

"प्रियांकाजींमध्ये इंदिरा गांधींची झलक दिसते", असं लिहून त्यांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. फोटोही प्रियांका गांधी यांचाच शेअर केला. त्यावरून सोशल मीडिया यूजर्सनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली आहे. "नेमकी श्रद्धांजली कुणाला वाहताय", "1980 च्याच दशकात आहात काय" असं विचारत काही Twitter यूजर्सनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली.

दिग्विजय सिंह यांनी प्रियांका गांधी यांचा शक्तिस्थळावरचा फोटो शेअर केला आहे. इंदिरा गांधी यांचं स्मृतिस्थळ शक्तिस्थल म्हणून ओळखलं जातं. तिथे श्रद्धांजली वाहायला गेल्या असतानाचा हा फोटो आहे.

प्रियांका यांची इंदिरा गांधींशी तुलना काही पहिल्यांदाच झालेली नाही. दिसण्यातल्या साम्यामुळे यापूर्वीही अनेक वेळा जाहीरपणे त्यांची आजीबरोबर तुलना झालेली आहे. इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात, त्यांच्याचसारख्या राहतात, असं अनेक जण बोलतात. पण यावरून काँग्रेसचे विरोधक नेहमीच अशी बरोबरी करणाऱ्यांवर टीका करतात. "इंदिराजींसारखं नाक आहे, म्हणून सत्ता मिळणार नाही. अजून त्याच जमान्यात आहात का" अशी टीका आताही दिग्विजय सिंह यांनी प्रियांकाचा फोटो शेअर केला तेव्हा झाली.

इंदिरा गांधी 1966 ते 1977  दरम्यान देशाच्या पंतप्रधान होत्या. आणीबाणी जाहीर करून त्यांनी काही काळ संपूर्ण सत्ताही काबीज केली. पण त्यानंतरची निवडणूक हरल्यानंतर 1980 मध्ये पुन्हा एकदा त्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्या होत्या. 1984 मध्ये त्यांच्याच शीख अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 31, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या