नवी दिल्ली, 28 डिसेंबर : भारत आणि चीन यांच्यातील तणाव (India-China tensions) 2020 हे वर्ष संपत आलं तरी कमी होताना दिसत नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) वर चीननं (China) यापूर्वीच शांततेचा भंग करुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय नागरिकांना चीनमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या या कुरापतींना भारतानं चोख उत्तर दिलं आहे. चीननी नागरिकांना भारतामध्ये येण्याची परवानगी देऊ नये असे अनौपचारिक निर्देश केंद्र सरकारनं सर्व भारतीय एअरलाईन्सला दिले आहेत.
काय आहेत निर्देश?
भारत आणि चीनमधील थेट विमान सेवा सध्या बंद आहे. मात्र चिनी नागरिक अन्य देशांमधून भारतामध्ये येतात. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) पार्श्वभूमीवर ज्या देशांमधील विमानांना भारतामध्ये येण्याची परवानगी आहे, त्या देशातून चिनी नागरिक भारतामध्ये येतात. युरोपीयन देशांशी भारताचं एअर बबल सिस्टम आहे. त्यामुळे अनेक चिनी युरोपीयन देशांच्या मार्गे भारतामध्ये दाखल होतात.
भारताने सध्या सर्व विदेशी नागरिकांचे पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. मात्र यांना कामाच्या निमित्तानं व्हिसाच्या अन्य श्रेणीमधून भारतामध्ये येण्याची परवानगी आहे. चिनी नागरिकांना भारतामध्ये आणू नये असे स्पष्ट निर्देश काही आठवड्यांपूर्वी विदेशी एअरलाईन्सला दिले आहेत. भारत सरकारानं याबाबतचा आदेश लेखी द्यावा अशी मागणी विदेशी एअरलाईन्सनं केली असल्याची माहिती आहे.
भारतानं का केली कारवाई?
चीन सरकारनं त्यांच्या देशात अडकलेल्या शेकडो भारतीयांना मायदेशी परतण्याची परवानगी नाकारली आहे. चीनच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सुमारे 1500 भारतीय अडकले आहेत. चीन सरकारच्या धोरणांमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चीनच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी भारतानं ही कारवाई केली आहे.
चीननं नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोना व्हायरसचं (Coronavirus) कारण देत काही देशांमधील नागरिकांना प्रवेश बंद केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, India china