नोटबंदीची 3 वर्षे, देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग की उभारी?

नोटबंदीची 3 वर्षे, देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग की उभारी?

3 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक नोटबंदीची घोषणा केली होती.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी तीन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 ला ऐतिहासिक निर्णय घेत नोटबंदीची घोषणा केली होती. त्यांनी रात्री 8 वाजता अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे काळा पैसा चलनातून बाहेर जाईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यानंतर काही महिने नागरिकांना रोकड टंचाई निर्माण झाली होती. अनेक नियमांमुळे मोठे व्यवहार करणे कठिण झाले होते.

नोटबंदी करताना सरकारने म्हटलं होतं की, देशातील काळ्या पैशाला आळा बसेल. मात्र नोटबंदीनंतर जवळपास 99 टक्के पैसै बँकेत भरण्यात आले होते. नोटबंदीला मंजूरी देणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने म्हटलं होतं की, काळ्या पैशातील मोठा भाग हा रोकड रुपात नाही तर इतर प्रकारात गुंतवला जातो. त्यामध्ये सोनं किंवा स्थावर मालमत्ता यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत या प्रकारच्या निर्णयाचा परिणाम होत नाही.

रिझर्व्ह बँकेने म्हटलं की, बनावट नोटांची समस्या कधीच मोठी नव्हती. इतक्या मोठ्या अर्थव्यवस्थेत 400 कोटी रुपये बनावट चलन हे प्रमाण जास्त नाही. नव्याने जारी करण्यात आलेल्या 500 च्या नोटांच्या बनावट नोटा 2018-19 मध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत. 2016-17 मध्ये 2 हजाराच्या 638 बनावट नोटा सापडल्या होत्या. तर 2017-18 मध्ये हीच संख्या 17 हजार 938 वर पोहचली होती.

याशिवाय सरकारकडून दुसऱ्या बाजूला 2 हजारांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. लोक 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करत असून त्यांचा वापर कमी केला जात असल्याचं बँकेने म्हटलं आहे.

नोटबंदीवेळी देशात डिजिटल आणि कार्ड पेमेंटचं प्रमाण वाढलं होतं. मात्र, पुन्हा एकदा हे प्रमाण नोटबंदीच्या आधी होतं एवढंच आलं आहे. इतकंच नाही तर आतापर्यंत अशी कोणतीच आकडेवारी समोर आलेली नाही ज्यामुळे टेरर फंडिंग किंवा भ्रष्टाचार कमी झाल्याचं स्पष्ट होईल.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नोटबंदीसोबतच देशात मंदीला सुरूवात झाली. रेटिंग एजन्सी Crisil ने ऑगस्टमध्ये विकास दराचा अंदाज कमी करण्यात आला होता. याला नोटबंदी हे एक कारण होतं. रेटिंग एजन्सीने म्हटंल होतं की, सध्याच्या मंदीची सुरुवात नोव्हेंबर 2016 पासून झाली होती. नोकऱ्या कमी झाल्या आणि लोकांच्या उत्पन्नातही घट झाली. त्यानंतर जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू केल्यानंतर दुसरा धक्का बसला. यामुळे निर्यातीत घट झाली. 2015 मध्ये जीडीपी 7.98 टक्के इतका होता तो आता 5 टक्क्यांवर पोहचला आहे.

पंतप्रधान मोदींनी अनेकदा नोटबंदीमुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांना दणका बसला असं म्हटलं आहे. यामुळे करामध्ये वाढ झाली असल्याचं सांगत आजही विरोधक नोटबंदीवरून गोंधळ घालत असतात असं मोदी म्हणताना दिसतात. नोटाबंदीमुळे विरोधांच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या असं म्हणत पंतप्रधान मोदी टीका करत असतात.

नोटबंदीमुळे एक लाख 30 हजार कोटींचा हिशोब मिळाला. तसेच 50 हजार कोटींपेक्षा जास्त निनावी संपत्ती जप्त करण्यात आली. याशिवाय 3 लाखांहून अधिक बनावट कंपन्यांना टाळं लावल्यामुळे काळे धंदे करणाऱ्यांवर मर्यादा आल्याचं मोदींनी त्यांच्या भाषणांमधून अनेकदा सांगितलं आहे.

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 12:16 PM IST

ताज्या बातम्या