पणजी, 13 जून : मॉन्सूनपूर्व पावसाचं आगमन झाल्याने समुद्रात जावू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं. मात्र असं असतानाही अनेक पर्यटक सुरक्षा नियमांचं पालन न करता समुद्रात जातात आणि जीव धोक्यात घालतात. पावसाळी वातावरणात समुद्र हा खवळलेला असतो. पाण्याचा जोर जास्त असतो. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या निमांचं पालन न करणाऱ्या एका तरुणाला तटरक्षक दलाने थरारक करवाई करत समुद्रातून वाचवलं.
उत्तर गोव्यातल्या काबो दे रामा बीचवर एक 20 वर्षांचा तरुण समुद्रात पोहायला गेला. पाण्याचा जोर जास्त असल्याने तो समुद्रात ओढला गेला आणि खोलवर खेचला गेला. त्याला किनाऱ्यावर येणं शक्य झालं नाही त्यामुळे तो बुडायला लागला. किनाऱ्यावरच्या लोकांनी ही बातमी तातडीने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तटरक्षक दलाला माहिती कळवली. त्यांनी तातडीने हेलिकॉप्टर पाठवून त्या तरुणाला दोर टाकून खेचून घेतलं.
जास्त वेळ पाण्यात राहिल्याने त्या तरुणाची प्रकृती बिघडली असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
#WATCH Indian Coast Guard rescued a man from drowning, 2 nautical miles North of Cabo de Rama beach, Goa, earlier today. The survivor in his early 20s was swept away by ebbing waves from the beach and is now stable. pic.twitter.com/IX9Gs03WG2
— ANI (@ANI) June 13, 2019
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर एकाचा मृत्यू
वायू चक्रीवादळाने महाराष्ट्रामध्ये दुसरा बळी घेतला आहे. वांद्र्याच्या बँडस्टँड समुद्रात बुडाल्याने एका 29 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वायू चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे कोणीही समुद्रकिनारी जायचं नाही अशा सुचना महाराष्ट्र सरकार आणि हवामान विभागाकडून देण्यात आल्या होत्या. समुद्र किनारी जाण्यावर बंदी असतानादेखील अशी घटना घडल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई आणि कोकणातील अनेक ठिकणी वायू चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे मुंबईमध्ये अनेक शहरामध्ये झाडं कोसळली. ज्यामध्ये सगळ्यात जास्त झाडं ही बोरीवली भागात कोसळली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहरामध्ये 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. तर अशा परिस्थीत कोणालाही समुद्रकिनारी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वायू चक्रीवादळ जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाण्यावरही सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घालण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा