हे ऍप चिनी हॅकर्सपासून भारतीय सैन्याची गुपितं ठेवणार सुरक्षित

हे ऍप चिनी हॅकर्सपासून भारतीय सैन्याची गुपितं ठेवणार सुरक्षित

चिनी हॅकर्स भारतीय सैन्याची गुप्त माहिती हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे हॅकिंग रोखण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी स्वत:साठी नवीन मेसेजिंग ऍप तयार केलं आहे. या ऍपला साई असं नाव देण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : भारत आणि चीन यांच्यातला लडाख सीमेवरचा तणाव सहा महिन्यांपासून कायम आहे. दोन्ही बाजूंनी सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. यातच आता चिनी हॅकर्स भारतीय सैन्याची गुप्त माहिती हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे हॅकिंग रोखण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी स्वत:साठी नवीन मेसेजिंग ऍप तयार केलं आहे. या ऍपला साई असं नाव देण्यात आलं आहे.

ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरीस भारतीय सैन्याने साई (Sequre Application for Internet) नावाचं मेसेजिंग ऍप सुरू करण्याची घोषणा केली होती. सैन्याने परस्पर चर्चा करून याबाबतच्या गोष्टी गुप्त ठेवल्या आहेत.

यात ऑडिओ व्हिडिओ कॉल, मेसेज या गोष्टी सहज करता येणार आहेत. तसेच कुठल्या गोष्टी हॅक किंवा लिक होण्याची भीतीसुद्धा यात असणार नाही. हे ऍप पूर्णपणे लष्करातील लोकांना मदत करण्यासाठी सज्ज आहे. विशेषतः चीन आणि पाकिस्तानच्या तणावाखाली लडाख आणि काश्मीर नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सैन्यासाठी हे ऍप तयार केलं गेलं आहे. भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, हे ऍप आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारत योजनेअंतर्गत तयार केले गेले आहे. संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सैन्यातील लोकांमध्ये गुप्त प्रकारे पाठवण्यासाठी हे ऍप तयार केलं असून, ते इन्क्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करतं.

सैन्याला या नवीन ॲपची आवश्यकता का आहे?

बऱ्याच काळापासून पाकिस्तान आणि चीन भारताच्या सुरक्षितते संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न करत होतं. याबद्दल सतत बातम्या येत होत्या. तसंच भारतीय लष्कारालाही याबाबतची कुणकूण लागली होती. अनेकदा सैनिक हनीट्रॅपमध्येही अडकले होते. म्हणूनच काही महिन्यांपूर्वीच भारतीय लष्कराने फेसबुक आणि इंस्टाग्राम यांच्यासह 89 मोबाईल ऍप्सवर बंदी घातली होती.

आधीपासूनच आहेत बरेच आदेश

या बंदी घातलेल्या ॲप्समध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ट्रूकॉलरचा समावेश आहे. पण व्हॉट्सऍप, ट्विटर, यूट्युब यांचा वापर करायला सैनिकांना परवानगी आहे. फक्त त्याचा उपयोग करताना हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, कुठला फोटो किंवा इतर माहिती लीक होणार नाही. एखाद्या सैनिकाच्या मोबाईलवर कुठलं बंदी घातलेलं ऍप दिसून आलं, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते.

2019 मध्ये व्हॉट्सऍपच्या बाबतीत विशेष लक्ष देताना सैनिकांना सूचना केल्या होत्या की, ज्या ग्रुपमधील प्रत्येकाला सैनिक वैयक्तिक ओळखत नाही, त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका. लष्करी पार्श्वभूमी असलेले फोटो किंवा तुम्ही लष्करात आहात, ही ओळख जाहीर होईल, असं कुठलंही वर्तन सोशल मीडियावर करू नये. सैन्याच्या सल्लागारांनी सांगितले होते की ज्या गोष्टी आकर्षक दिसतात, त्या कदाचित 'हनी ट्रॅप' असू शकतात, म्हणजेच शत्रू देशातील लोक गुप्त माहिती काढण्यासाठी बनावट प्रोफाईल द्वारे ओळख वाढवू शकतात. याबाबतची प्रकरणं समोर आल्यामुळे अधिक काळजी घेतली जात आहे.

हनीट्रॅपद्वारे कसं फसवतात?

सैन्यातील लोकांवर पूर्ण लक्ष ठेवून नंतर सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल बनवलं जात. त्यानंतर हळूहळू एक-एका व्यक्तीला संपर्क केला जातो.‌ माहिती मिळवण्यासाठी जवळ जाण्यासाठी लाडी-गोडी दाखवली जाते. विचित्र फोटो शेअर केले जातात. व्हॉट्सऍपवर गप्पा मारल्या जातात, तसंच वैयक्तिक फोटो चर्चेची देवाण-घेवाण केली जाते. याच वेळी जेव्हा सैन्याच्या अधिकाऱ्याची खात्री पटते तेव्हा, त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातो. या गोष्टी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे खूपच धोकादायक ठरू शकतात.

चीनमध्ये आहेत सुमारे एक लाख हॅकर्स

चीनमध्ये सुमारे एक लाख हॅकर्स असल्याची बातमी पुढे आली आहे. 2019 मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चीनच्या सायबर हल्लेखोरांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हॅकर्स सैन्यातील लोकांकडून गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं. चीनमध्ये सायबर फोर्सही असून, प्रत्यक्ष युद्धापेक्षा सायबर युद्धात पैसे गुंतवण्याला चीन प्राधान्य देतो.

चीनमध्ये कशाप्रकारे काम केले जातं?

जेव्हा एखादा विभाग हेरगिरी करत असतो, तेव्हा एक गट सॉफ्टवेअरमध्ये गडबड करून ठेवतो. पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ चायनाचा असा विश्वास आहे की, सैन्यावर खर्च करण्यापेक्षा शत्रूचा देश कमकुवत करण्यासाठी सायबर वॉरचा वापर करायचा, कारण ते कमी खर्चिक आहे. हॅकिंगच्या माध्यमातून गुप्तपणे शत्रूची सगळी माहिती मिळवायची आणि तिचा वापर आपल्या सैन्यासाठी करायचा, तसंच शत्रूचे सैन्य कमकुवत करायचे.

Published by: Shreyas
First published: November 4, 2020, 7:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या