भोपाळ, 16 मे : शत्रूराष्ट्र पाकिस्तानला सैन्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती पुरवल्याप्रकरणी भारतीय लष्कारातल्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला कर्मचारी मध्य प्रदेशातील महू येथील इन्फंट्री बटालियनमध्ये क्लार्क पदावर कार्यरत होता. भारतीय लष्करातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवण्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. शत्रूराष्ट्रानं 'हनीट्रॅप'द्वारे त्याला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून माहिती काढून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रीय गुप्तचर संस्था, लष्कर गुप्तचर संस्था आणि मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
In joint Op by IB,Military Intelligence&Police,an Indian Army clerk posted in an infantry battalion in Mhow,MP has been arrested after he was caught allegedly supplying information to Pak. He's suspected to have been virtually honey-trapped by enemy intelligence agencies;probe on
मिळालेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्याच्या संशयास्पद वागणुकीवरून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. भारतीय लष्करातील हा कर्मचारी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील एका महिलेसोबत फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आला आणि तिच्या जाळ्यात ओढला गेला. यादरम्यान, या कर्मचाऱ्यानं भारतीय लष्करासंबंधीत महत्त्वपूर्ण स्थान, हालचाली आणि अन्य माहिती तिला देण्यास सुरुवात केली.
फेसबुक तसंच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून स्वतःला ज्ञात असलेली तसंच त्याच्या अन्य संपर्कांद्वारे माहिती गोळा करून तो तिला पुरवू लागला. धक्कादायक बाब म्हणजे या मोबादल्यात त्याला रोखरक्कम मिळत असल्याचंही म्हटलं जात आहे.
एकूणच संशयास्पद हालचालींवर गुप्तचर संस्थांनी त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. ठोस पुरावे हस्तगत केल्यानंतर 15 मे रोजी भारतीय लष्कारासोबत गद्दारी करणाऱ्या या कर्मचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.