Home /News /national /

'इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या हल्ल्यांमुळे लोकशाही देशांतल्या एकात्मतेला धोका' - फ्रान्स हल्ल्यांनंतर माजी भारतीय अधिकाऱ्यांनी केलं सावध

'इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या हल्ल्यांमुळे लोकशाही देशांतल्या एकात्मतेला धोका' - फ्रान्स हल्ल्यांनंतर माजी भारतीय अधिकाऱ्यांनी केलं सावध

माजी IFS अधिकाऱ्यांनी एकत्र येत फ्रान्सला पाठिंबा द्यायच्या भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात भारतात निदर्शनं झाली, ती अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : भारताच्या परराष्ट्र सेवेत पूर्वी कार्यरत असणाऱ्या माजी अधिकाऱ्यांनी फ्रान्समधल्या हल्ल्यांचा (France terrorist attack) तीव्र निषेध केला आहे. भारतीय दूतावासातल्या (Indian Ambassadors) या माजी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे आणि त्यात इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या या हल्ल्यांचे लोकशाही देशांतल्या एकात्मतेवर आणि कायद्याने चालणाऱ्या समाजावर परिणाम होऊ शकतील, असा इशाराही दिला आहे. 'भारताने फ्रान्स हल्ल्यांचा निषेध करून अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन (emmanuel macron) यांना पाठिंबा दर्शवला ही अत्यंत योग्य आणि द्विपक्षीय संबंधांना पूरक अशी कृती आहे. त्यामुळे भारतात मॅक्रॉन यांच्या विरोधात वैयक्तिक आणि फ्रान्स देशाविरोधात झालेली निदर्शनं अगदी अस्थानी आहेत', असं या पत्रकार म्हटलं आहे. या पत्रावर 22 माजी IFS अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. 'फ्रान्समध्ये लोकशाहीची पाळमूळं खोलवर रुतलेली आहेत. या देशाच्या इतिहासामुळे आणि संस्कृतीमुळे तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही नागरिकांच्या नसानसांत भिनलं आहे. फ्रान्समधल्या मुस्लीम नागरिकांना धर्म आणि देश याबद्दलचा दृष्टिकोन वेगळा आहे. तिथल्या संस्कृतीतली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य यांना वेगळे आयाम आहेत. त्यामुळे कुठल्याही एका संकुचित चष्म्यातून आणि धार्मिक न्यायाने फ्रान्सच्या हल्ल्यांचा विचार करता येणार नाही.' 'भारताने फ्रान्सच्या अध्यक्षांना पाठिंबा देताना योग्य तीच भूमिका घेतलेली आहे. दहशतवाद हा कुठल्याही स्वरूपाचा असेल तरी त्याचा निषेधच झाला पाहिजे, ही भारताची भूमिका राहिलेली आहे. दुसऱ्या देशाच्या पाठिंब्याने कार्यरत असलेल्या दहशतवादाचा फटका भारताला बसलेला आहे. भारताचं या सीमेपारच्या दहशतवादाने मोठं नुकसान केलं आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भारताने आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा जागतिक शांतता आणि एकात्मतेला धोकादायक असल्याचं जगापुढे सांगितलं आणि या आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात जग एकवटलं आहे', असं या पत्रात म्हटलं आहे. "दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी फ्रान्सच्या पाठिशी उभं राहण्याची भारताची भूमिका योग्य आहे. दोन देशांतल्या संबंधांच्या धोरणाला अनुलक्षून आहे", असंही या माजी देशदूतांनी म्हटलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: France

    पुढील बातम्या