भारताच्या हवाई हल्ल्यात 'जैश' च्या 4 इमारती उद्ध्वस्त, असा मिळाला पुरावा

भारताच्या हवाई हल्ल्यात 'जैश' च्या 4 इमारती उद्ध्वस्त, असा मिळाला पुरावा

ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला ती पूर्ण जागा पाकिस्तानने बंद केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 मार्च : जैश-ए-मोहम्मद च्या प्रशिक्षण छावण्यांमध्ये भारतीय हवाई दलाने इस्रायली बॉम्बच्या मदतीने हल्ला केला. हे बॉ़म्ब इमारतीत घुसल्यानंतरच त्याचा स्फोट होतो.

भारताने पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला, हे पाकिस्तानने मान्य केलं पण या हल्ल्यामुळे कोणतंही नुकसान झालं नाही, असं पाकिस्तानचं म्हणणं होतं. या घटनेच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना नेण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला होता.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्या भागातले मदरसे बंद का केले, असा सवाल एका भारतीय अधिकाऱ्याने विचारला आहे. पत्रकारांना या मदरशामध्ये जाण्याची परवानगी का देण्यात आली नाही, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

'इंडियन एक्सप्रेस' ने दिलेल्या वृत्तानुसार, ही मदरशाची इमारत गेस्ट हाऊससाठी वापरली जात होती. तिथे मौलाना मसूद अझरचा भाऊ राहत होता. त्याशेजारी एक एल आकाराची इमारत होती. त्यामध्ये प्रशिक्षक राहत होते.

एक दोन मजली इमारत मदरशामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होती. आणखीही एका इमारतीमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात होतं. या चारही इमारतींवर बॉम्बहल्ला करण्यात आला, असं या बातमीमध्ये म्हटलं आहे.

हे फोटो प्रसिद्ध करायचे की नाही याबद्दल राजकीय नेतृत्वच निर्णय घेईल. रडारद्वारे घेण्यात आलेले हे फोटो उपग्रहांद्वारे काढण्यात आलेल्या फोटोंइतके स्पष्ट नाहीत. त्या भागात ढगांचं अच्छादन असल्याने हे फोटो चांगले आले नाहीत, असंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

याच ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले कारण इथे फारसे पाकिस्तानचे नागिरक राहत नाहीत. हवाई दलाला मिळालेल्या गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हा हल्ला करण्यात आला.

ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला ती पूर्ण जागा पाकिस्तानने बंद केली आहे. त्यामुळे अजूनतरी नेमकं नुकसान किती झालं आणि किती जण मारले गेले याचा अंदाज लावणं कठीण आहे, असंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या