Exit Poll : दिल्लीत ‘आप’वर झाडू, भाजपच मारणार बाजी

एक्झिट पोलमध्ये दिल्लीत आप आणि काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. तर भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालंय.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 07:35 PM IST

Exit Poll : दिल्लीत ‘आप’वर झाडू, भाजपच मारणार बाजी

नवी दिल्ली 19 मे :  राजधानी दिल्लीत लोकसभेच्या सात जाग आहेत. 2014 च्या निवडणुकीत या सातही जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. त्यानंतर भाजप आणि ‘आप’मध्ये जोरदार संघर्ष झाला. तर काँग्रेसला आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडावं लागतंय.


इंडिया टीव्ही आणि सीएनक्स Exit Poll नुसार सर्व सात जागा भाजपला मिळणार आहे. ‘आप’वर मतदारांनी झाडू फिरवलाय. ‘आप’ आणि काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


चाणक्य आणि न्यूज24 ने केलेल्या एक्झिट पोलमध्येही दिल्लीतल्या सर्व सातही जागा भाजपलाच देण्यात आल्यात आहेत. काँग्रेस आणि आपला आपलं खातंही उघडता आलं नाही.

Loading...


पाच वर्षानंतरही नरेंद्र मोदींचा प्रभाव कायम असल्याने आपने मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दाखवली होती. ज्या काँग्रेसला दुषणं देत त्यांनी आपला पक्ष काढला आणि राजकारणात नवी क्रांती करत असल्याची घोषणा केली, त्याच आपला पाच वर्षानंतर काँग्रेस सोबत आघाडी करण्यासाठी जाहीर आवाहन करावं लागलं होतं. मात्र जागांवरून गणित बिनसल्याने काँग्रेसने आघाडी करण्यास नकार दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आपला करिष्मा सिद्ध करण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. आपमध्येही बरीच फाटाफूट झाल्याने त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

तर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितांवर विश्वास टाकला. ८० वर्षांच्या शीला दीक्षित यांना प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष करत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली. दिल्लीत तिरंगी लढत झाल्याने त्याचा फायदा भाजपलाच होण्याची शक्यता आहे. यावेळी दिल्लीत ६०.२१ टक्के मतदान झालं. २०१४मध्ये ६५ टक्के मतदान झालं होतं.

दिल्लीतल्या मुख्य लढती

पूर्व दिल्लीत गौतम गंभीर बाजी मारणार का?

सर्वांचं लक्ष लागलं ते पूर्व दिल्लीतली लढतीकडे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भाजपने तिकीट दिल्यानं ही लढत जास्त चुरशीची झाली. तर आपने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी घेतलेल्या उच्च शिक्षित अतिशी मार्लेना यांना उमेदवारी दिलीय तर काँग्रेसने अरविंदसिंह लव्हली यांना मैदानात उतरवलं होतं. अतिशी यांच्याविषयी छापलेल्या वादग्रस्त पत्रकामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. हे पत्रक गौतम गंभीर यांनीच छापल्याचा आरोप आपने केलाय. तर आरोप सिद्ध झाला तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन असं आव्हान गौतम गंभीर यांनी दिलं होतं.

उत्तर पूर्व दिल्लीत शीला दीक्षित विरुद्ध मनोज तिवारी

उत्तर पूर्व दिल्लीत भाजप आणि काँग्रेसने आपल्या प्रदेशाध्यक्षांना मैदानात उतरवलं. शीला दीक्षित या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर मनोज तिवारी यांना भाजपने उमेदवारी दिली होती. तर दिलीप पांडे आपचे उमेदवार होते. दिल्ली विधानसभेच्या पराभवानंतर शीला दीक्षित सक्रिय राजकारणातून काहीशा बाहेर पडल्या होत्या. मात्र काँग्रेसने त्यांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा डाव खेळला. सलग १० वर्ष त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळल्याने लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे त्याचाच फायदा घेण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला.

नवी दिल्लीत दोन दिग्गजांची झुंज

प्रतिष्ठेच्या नवी दिल्ली मतदार संघात भाजपच्या मिनाक्षी लेखी आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अजय माकन यांच्यात मुख्य लढत होती. तर आपने बृजेश गोयल यांना मैदानात उतरवलं होतं. सुप्रीम कोर्टात वकिल असलेल्या लेखी यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध तक्रार केल्यामुळेच त्यांना राफेल प्रकरणी कोर्टात लेखी माफी मागावी लागली होती. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला होता.

विजेंद्र सिंह मैदान गाजवणार का?

दक्षिण दिल्लीतून काँग्रेसने बॉक्सर विजेंद्र सिंहला उमेदवारी दिल्याने इथली लढत रंगतदार ठरली होती. तर आपले प्रवक्ते राघव चढ्ढा यांना मैदानात उतरवलं होतं. तर भाजपने विद्यमान खासदार रमेश बिधूडी यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं होतं.

केंद्रिय मंत्री हर्षवर्धन यांची प्रतिष्ठा पणाला

प्रतिष्ठेच्या चांदणी चौक मतदार संघात भाजपने केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं तर काँग्रेसने जेपी अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. तर आपने पंकज कुमार गुप्ता यांना तिकीट दिलं होतं. हर्षवर्धन यांची प्रतिमा आणि काम चांगलं असल्याने या मतदार संघातून त्यांचं पारडं जड होतं.

उत्तर पश्चिम दिल्ली

उत्तर पश्चिम दिल्लीतून भाजपने प्रसिद्ध सूफी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली होती तर आपकडून गुग्गन सिंह तर काँग्रेसकडून लिलोथिया मैदानात होते.

या निवडणुकीत विधान सभेच्या वेळी होती तशी आपची हवा नाही. गेल्या पाच वर्षात यमुनेतून बरच पाणी पाहून गेल्याने सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2019 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...