मुंबई, ता. 03 मे : भारतात विकसित झालेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'अग्नि -5'ची रविवारी यशस्वीपणे चाचणी करण्यात आली. आण्विक शस्त्रांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारं हे क्षेपणास्त्र 5000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतं.
संरक्षण सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, एका पृष्ठभागावरून दुसऱ्या पृष्ठभागावर हल्ला करण्यासाठी सक्षम असलेलं हे क्षेपणास्त्र सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी बंगालच्या खाडीत डॉ. अब्दुल कलाप बेटावर आईटीआर आणि मोबाइल लॉन्चरच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलं. अग्नि -5 या या क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी करण्यात आली होती, जी यशस्वीरित्या पार पडली आहे.
अग्नि -5 हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक उपकरणं आणि नेव्हिगेशन, वारहेड आणि इंजिनच्या रूपात नवीन तंत्रज्ञानासह सुसज्ज क्षेपणास्त्र असल्याचं संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
'अग्नी -5' या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 19 एप्रिल 2012 रोजी करण्यात आली. दुसरी चाचणी 15 सप्टेंबर 2013 रोजी , तिसरी चाचणी 31 जानेवारी 2015 आणि चौथी 26 डिसेंबर 2016 रोजी, पाचवी चाचणी 18 जानेवारी 2018 रोजी करण्यात आली. या सर्व चाचण्या योग्य रित्या पार पडल्यामुळे हे क्षेपणास्त्र भारताच्या सुरक्षेसाठी सज्ज झालं आहे असं म्हणायला हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agni 5, India, Missile, Nuclear capable, अग्नि -5, क्षेपणास्त्र, भारत