श्रीनगर, 1 मार्च : जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात इथं लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पहाटेपासून ही चकमक सुरू असल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर सातत्याने धुमसत आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या कुरापतींना भारतीय सैन्याने आक्रमक प्रत्युत्तर दिल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
दरम्यान, भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची अखेर सुटका करण्याची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घोषणा केली आहे. आज वाघा बार्डरवरून त्यांना भारतात सोडण्यात येणार आहे. भारतीय वायू दलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत अभिनंदन भारतात परतणार आहे.
भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्तान अखेर विंग कमांडर अभिनंदन याची शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत त्यांनी ही घोषणा केली. अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारतावर अटी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले होते.
जिनिव्हा करारानुसार अभिनंदनला सोडणं पाकिस्तानला भाग होतं. तर पाकिस्तानचा दबावाचा प्रयत्न होता. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने पाकिस्तानला आणखी हल्ल्याची भीती वाटत होती. पाकिस्तानचा हा डाव भारताला माहित होता. त्यामुळे अशी कुठलीही अट भारताने मान्य केली नाही आणि अखेर पाकिस्तानला भारताच्या दबावापुढे झुकावं लागलं.
VIDEO : सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट टाकणाऱ्यांनो, वीरपत्नी काय म्हणते ते ऐकाच!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा