पुलवामा हल्ल्याचे पुरावे देत भारताने पाकिस्तानला ठणकावलं, आता कारवाई करा!

पुलवामा हल्ल्याचे पुरावे देत भारताने पाकिस्तानला ठणकावलं, आता कारवाई करा!

लाकोट इथं जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेची जमवाजमव आणि 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं शिबिर याचे सर्व पुरावे भारताने पाकिस्तानला दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे द्या असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने आज पुरावे सोपवले आणि कारवाई करा असं ठणकावलं. पकिस्तानने पोसलेल्या जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारताने याचं पाकिस्तानी कनेक्शन उघड केलं होतं. पुरावे देऊन फायदा नाही अशी भारताची भूमिका होती.


गेल्या दहा दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने पुरावे देण्याची मागणी करत होता. तर या आधी अनेकदा पुरावे दिले काय कारवाई केली अशी भारताची भूमिका होती. मात्र आज दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावण्यात आले आणि त्यांना भारताने सर्व पुरावे दिले.


बालाकोट इथं जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेची जमवाजमव आणि 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं शिबिर याचे सर्व पुरावे भारताने पाकिस्तानला दिले आहेत. हे सर्व अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत होते आणि त्यांची भारतातल्या विविध शहरांमध्ये हल्ले करण्याची योजना होती असंही भारताने म्हटलं आहे.


पाकिस्ताननेच या दहशतवादी संघटनेला वाढवलं आणि अर्थपुरवढा केला आहे. या संघटनेची ढाल पुढे करून पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ही भारतात हल्ले घडवत असले असा भारताचा आरोप आहे.


पाकिस्तानचा यु टर्न


भारतीय हवाईदलाच्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये शिरून जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने सीमेजवळ कारवाई सुरू केली आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. बुधवारी सकाळी भारताची 2 विमानं पाडून 2 वैमानिकांना अटक केली असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. ' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला होता. भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला. इम्रान खान यांनी प्रेस कॉन्फरन्समध्येही 2 पायलट असल्याचं सांगितलं. संध्याकाळी मात्र पाकिस्तानने आपलाच दावा उलटवला. भारतीय हवाईदलाचा एकच पायलट ताब्यात असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे.


साडेसहा वाजता पाकिस्तान सरकारने आमच्या ताब्यात एकच अधिकारी असल्याचं सांगितलं. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी IAF चा एक पायलट आमच्या ताब्यात असल्याचं सांहितलं. विंग कमांडरशी पाकिस्तानी सेना नैतिकतेने वागत असल्याचंही त्यांनी ट्वीट करून सांगितलं. यावरून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला.


आत्तापर्यंत काय काय झालं?


पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले. या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचा भारताचा दावा होता आणि त्यानुसार पाकिस्तानवर कारवाईचा दबाव वाढवण्यात आला. 26 फेब्रुवारीला पहाटे भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि हे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत 200 ते 300 अतिरेकी मारले असल्याचा भारताचा दावा आहे.


भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा


आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला होता. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला होता.


भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं


भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.


सीमेवर गोळीबार


गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.


देशभरात हाय अॅलर्ट


उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले आहे.


पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी


भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी आक्रमक भूमिका घेतली. पाकिस्तानात सरकारविरोधात निर्माण झालेला क्षोभ कमी करण्यासाठी पाकिस्तानानी लढाऊ विमानांनी भारतीय हवाई सीमांचं उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानने केला. तर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर काय करता येईल यासाठी पाकिस्तानने देशातल्या तेलाच्या साठ्याचा आढावा घेण्याला सुरूवात केली आहे.


पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने देशातल्या तेल कंन्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर तेलाचे किती साठे उपलब्ध आहेत याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.


भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भारताकडून हल्ल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लष्कराला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा कायम राहावा यासाठी काय करता येईल याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.


VIDEO :अशा प्रकारे भारताने पाडलं पाकचं F16 विमान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 07:36 PM IST

ताज्या बातम्या