Home /News /national /

आता इंडिया गेटवर नाही, तर राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ प्रज्ज्वलित होणार अमर जवान ज्योती

आता इंडिया गेटवर नाही, तर राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ प्रज्ज्वलित होणार अमर जवान ज्योती

इंडिया गेटमध्ये असलेल्या अमर जवान ज्योतीचं स्थान बदलून ती राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये नेण्यात येणार आहे. तिथेच हुतात्मा जवानांना मानवंदना दिली जाईल.

नवी दिल्ली, 21 जानेवारी : राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची (Republic Day) तयारी सुरू आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये यावर्षीही हा दिन साजरा होणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यामध्ये दिल्लीच्या इंडिया गेटमध्ये (India Gate) असलेल्या वीर जवानांच्या आठवणरूपी अमर जवान ज्योतीलाही (Amar Jawan Jyot) अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर ही ज्योतच इंडिया गेटची ओळख मानली जाते. पण आता मात्र ही ओळख बदलणार आहे. आता अमर जवान ज्योती इंडिया गेटवर नाही, तर राष्ट्रीय युद्ध स्मारकात प्रज्ज्वलित केली जाणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या 1971 च्या युद्धाला 50 वर्षं (Indo-Pak War 50 Years) पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने अमर जवान ज्योतीला राष्ट्रीय युध्द स्मारकाजवळ हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आधी इंडिया गेटमध्ये असलेल्या अमर जवान ज्योतीला राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ जळणाऱ्या ज्योतीत विलीन केलं जाणार आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं लोकार्पण केलं होतं. अमर जवान ज्योतीतील मूळ ज्योत इथं प्रज्ज्वलित केली जाईल हा निर्णयही त्याचवेळेस घेण्यात आला होता. राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आता एक नवीन अमर जवान ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्याआधी प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती, लष्कर प्रमुख आणि मुख्य अतिथी अमर जवान ज्योतीपाशी जाऊनच शहिदांना आदरांजली वाहतात. नंतर हा सोहळा राष्ट्रीय युद्ध स्मारकापाशी केला जाऊ लागला. स्वातंत्र्यानंतर देशाचं संरक्षण करताना ज्यांनी प्राणांची आहूती दिली त्या हुतात्मा सैनिक आणि अनेक अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आलं आहे. हे नवीन स्मारक इंडिया गेट परिसरात 40 एकर जागेत आहे. याच्या भिंतीवर हुतात्मा सैनिकांची नावं आहेत.

हे वाचा - 426 जणांचे प्राण वाचवणारा हिरो, ‘या’ कर्मचाऱ्यामुळेच टळली दोन विमानांची टक्कर

राजधानी दिल्लीला भेट देणारा प्रत्येकजण इंडिया गेटवर जाऊन अमर जवान ज्योतीजवळ या सैनिकांना सलाम करतोच. ब्रिटिशांच्या काळात पहिलं जागतिक महायुद्ध (1914-1918) आणि तिसऱ्या अँग्लो- अफगाण (1919) युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या सन्मानासाठी स्मारक म्हणून हे 42 मीटर उंच इंडिया गेट उभारण्यात आलं होतं. इंडिया गेटवर सर्व सैनिकांची नावं कोरण्यात आली आहेत. तर 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या स्म्तीप्रीत्यर्थ 1972 मध्ये इंडिया गेटमध्ये अमर जवान ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली होती. या अमर जवान ज्योतीच्या स्मारकाच्या वर एक उलटी बंदूक आणि सैनिकाच्या हेल्मेटची प्रतिकृती आहे. त्याच्या बाजूलाच एक अखंड ज्योत तेवत असते. आता हीच अखंड ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारक परिसरात अखंड तेवणार आहे आणि आपल्यासाठी प्राणांचं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांचं आपल्याला सतत स्मरण करून देणार आहे.
First published:

Tags: Delhi, Republic Day

पुढील बातम्या