'त्या' विंग कमांडरची सुरक्षित सुटका करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

'त्या' विंग कमांडरची सुरक्षित सुटका करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

आंतरराष्ट्रीय करारानुसार अशा पायलटला योग्य वागणूक दिली जावी असा नियम आहे. त्याला संबंधीत देशाच्या स्वाधीन करावं असंही त्या करारामध्ये म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी :   पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय विंग कमांडरची तातडीने आणि सुरक्षित सुटका करावी अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानी लष्कराने ज्या बिभत्सपणे त्या जखमी पायलटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यावरही परराष्ट्रमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 या विमानाला पिटाळून लावताना भारताचं MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हा त्या विमानाचा पायलट होता. विमान कोसळल्यानंतर तो पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतलं.

जखमी अवस्थेतल्या अभिनंदन याचे व्हिडीओ पाकिस्तानी माध्यमांनी आणि लष्कराने व्हायरल केले होते. आंतरराष्ट्रीय करारानुसार अशा पायलटला योग्य वागणूक दिली जावी असा नियम आहे. त्याला संबंधीत देशाच्या स्वाधीन करावं असंही त्या करारामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडे ती मागणी केली आहे.

पाकिस्तानचा यु टर्न

भारतीय हवाईदलाच्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये शिरून जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने सीमेजवळ कारवाई सुरू केली आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. बुधवारी सकाळी भारताची 2 विमानं पाडून 2 वैमानिकांना अटक केली असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला होता. भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला. इम्रान खान यांनी प्रेस कॉन्फरन्समध्येही 2 पायलट असल्याचं सांगितलं. संध्याकाळी मात्र पाकिस्तानने आपलाच दावा उलटवला. भारतीय हवाईदलाचा एकच पायलट ताब्यात असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे.

साडेसहा वाजता पाकिस्तान सरकारने आमच्या ताब्यात एकच अधिकारी असल्याचं सांगितलं. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी IAF चा एक पायलट आमच्या ताब्यात असल्याचं सांहितलं. विंग कमांडरशी पाकिस्तानी सेना नैतिकतेने वागत असल्याचंही त्यांनी ट्वीट करून सांगितलं. यावरून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला.

आत्तापर्यंत काय काय झालं?

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले. या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचा भारताचा दावा होता आणि त्यानुसार पाकिस्तानवर कारवाईचा दबाव वाढवण्यात आला. 26 फेब्रुवारीला पहाटे भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि हे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत 200 ते 300 अतिरेकी मारले असल्याचा भारताचा दावा आहे.

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला होता. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला होता.

भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 08:16 PM IST

ताज्या बातम्या