नवी दिल्ली 13 ऑक्टोबर: भारत आणि चीन दरम्यान सीमेवरचा तणाव कायम आहे. हा तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजकीय स्तरावरही चर्चा सुरू आहे. मात्र त्यातून फारसं काहीही निष्पन्न झालेलं नाही. दोनही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेची 7वी फेरी सोमवारी पार पडली. त्यानंतर लष्कराकडून आज एक निवेदन जारी करण्यात आलं. दोन्ही देशांनी मतभेदांचं रुपांतर वादात होऊ न देण्याचं ठरवलं असल्याचं त्यात म्हटलं आहे.
लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनचं लष्कर गेल्या काही महिन्यांपासून समोरासमोर आहे. परिस्थिती स्फोटक बनल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे. सीमेवर जैसे थे परिस्थिती कायम राखली जावी असं भारताचं मत आहे. त्यामुळे चिनी सैन्याने माघारी जावं अशी भूमिका भारताने घेतली आहे.
मात्र चीन मागे हटायला तयार नाही. तसेच गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच या भागात गोळीबार झाला होता. दोन्ही देशांची चर्चा सकारात्मक झाली असून वाद वाढू नये असं दोघांनी ठरवलं असल्याचंही लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे. मात्र चीनचा काहीच भरवसा नसल्याने लष्कर प्रत्येक निर्णय सावधपणे घेत आहे.
मागच्या वेळी मीटिंगमध्ये काय झाले होते?
यापूर्वी, 21 सप्टेंबर रोजी मोल्दो येथील चिनी भागात, दोन्ही देशांमध्ये कॉर्प कमांडर स्तरावरील चर्चेची सहावी बैठक झाली होती. ही बैठक सुमारे 14 तास चालली. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही यात भाग घेतला. या बैठकीत दोन्ही देशांमधील ताण कमी करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेह येथे भारतीय लष्कराच्या 14 व्या लष्करांचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग होते. यावेळी भारताने हे स्पष्ट केले की जर तेथे डिसएन्गेजमेंट असेल तर ते संपूर्ण एलएसीवर असेल. अशा परिस्थितीत चिनी सैन्याने पॅंगॉंग त्सो लेकपासून सटी फिंगरपर्यंत 4-8 माघारी जावे, मात्र चिनी सैन्य यासाठी तयार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china