पाकिस्तानचा पुन्हा खोडसाळपणा; चुकीचा नकाशा दाखवल्याने अजित डोवल यांचं रशियात मोठं पाऊल

पाकिस्तानचा पुन्हा खोडसाळपणा; चुकीचा नकाशा दाखवल्याने अजित डोवल यांचं रशियात मोठं पाऊल

Shanghai Cooperation Organisation (SCO)च्या बैठकीत पाकिस्तानने पुन्हा एकदा खोडसाळपणा करत चुकीचा नकाशा सादर केला. या कृतीचा तडकाफडकी निषेध करण्यासाठी भारताच्या वतीने अजित डोवल (Ajit doval) यांनी रशियात मोठं पाऊल उचललं.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : पाकिस्तानने उद्दामपणा (Pakistan shows fictitious map including kashmir ) करत पुन्हा एकदा भारताची खोड काढली आहे.आंतरराष्ट्रीय परिषदेत चुकीचा नकाशा सादर करून पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीर (Jammu kashmir) आणि लडाख (Ladkh) पाकिस्तानचा भाग असल्याचं दाखवलं. एवढंच नाही तर गुजरातचा भाग असलेलं जुनागढसुद्धा (Junagadh) पाकिस्तानात दाखवण्याचा उद्दामपणा केला. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, Shanghai Cooperation Organisation (SCO) च्या सदस्य देशांची एक बैठक रशियात सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) यात सहभागी झाले आहेत. भारताच्या वतीने या बैठकीत अजित डोवल (Ajit Doval) यांनी भाग घेतला होता. या बैठकीत पाकिस्तानच्या प्रतिनिधीने एक काल्पनिक नकाशा सादर केला. यात भारतीय भूभाग पाकिस्तानच्या हद्दीत दाखवलेला पाहिल्यावर संतापलेल्या अजित डोवल यांनी या कृत्याचा तातडीने निषेध नोंदवत सभात्याग केला.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)अजित डोवल यांनी घेतलेल्या या निर्णयाला परराष्ट्र मंत्रालयाने पाठिंबा दर्शवला आहे. "या बैठकीच्या उद्देशालाच पाकिस्तानच्या कृत्याने खीळ बसली आहे. हे वागणं बैठकीच्या नियमांच्या विरोधात आहे. याविषयी यजमान राष्ट्राशी बातचित केल्यानंतर भारताने ही बैठक निषेध म्हणून सोडून द्यायचा निर्णय घेतला आहे", असं निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA)प्रवक्ते अनुराह श्रीवास्तव यांनी दिलं.

या बैठकीला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न पाकिस्ताने केला. भारताने मीटिंग अर्धवट सोडल्यानंतरही पाकिस्तानने याच दिशेने चुकीचा दृष्टिकोन बैठकीत मांडल्याचंही श्रीवास्तव यांनी सांगितलं.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचं हे कृत्य SCO च्या ध्येयधोरणांचं उल्लंघन करणारं आहे. SCO सदस्य राष्ट्रांचं सार्वभौमत्व आणि त्यांच्या भूमीची एकात्मता भंग करण्याचा हा प्रयत्न आहे.

भारताने याचा तातडीने निषेध नोंदवला. बैठकीचे यजमान असणाऱ्या रशियानेसुद्धा पाकिस्तानला हा नकाशा वापरण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने हाच चुकीचा नकाशा पुढे रेटला.

रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सचिव निकोलाय पात्रुशेव यांनी स्पष्ट केलं की, "पाकिस्तानने केलेल्या कृत्याला रशियाचा पाठिंबा नाही. पाकिस्तानचं हे उद्दाम कृत्य provocative act - भारताच्या SCO मधील सहभागाच्या मध्ये येणार नाही, अशी आशा आहे."

गेल्याच महिन्यात काश्मीरसाठी असणारं कलम 370 रद्द केल्याची वर्षपूर्ती झाली तेव्हा पाकिस्तानने खोडसाळपणा करत संपूर्ण काश्मीर पाकिस्तानचा भाग असणारा नकाशा प्रसिद्ध केला होता. पाकिस्तान व्याप्त काश्मीरच नव्हे तर जम्मू काश्मीरचा भारताच्या ताब्यातला भाग, अगदी लडाखसुद्धा त्या नकाशात पाकिस्तानचा भाग असल्याचं दाखवलं आहे. एवढंच नाही तर गुजरातमधलं पूर्वीचं जुनागढ संस्थानही पाकिस्तानने या नकाशात स्वतःच्या देशाचा भाग म्हणून दाखवलं आहे.

भारताने त्या वेळीच हा नकाशा म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट केलं होतं. गुजरातचा भाग पाकिस्तानला जोडणं किंवा भारतीय केंद्रशासित प्रदेश असणारे जम्मू काश्मीर आणि लडाख पाकिस्तानचा भाग दाखवणं हा 'an exercise in political absurdity' म्हणजे राजकीय असमंजसपणा किंवा हास्यास्पद उद्योग असल्याची प्रतिक्रिया भारताने दिली होती.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 15, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या